एटापल्ली तालुक्यातील वांडोळी जंगल परिसरात 12 नक्षलवादी ठार ; 1 पी.एस.आय.जखमी. ★ C - 60 पथकाचे जवान व नक्षलवादी यांच्यात 6 तास चालली चकमक.

एटापल्ली तालुक्यातील वांडोळी जंगल परिसरात 12 नक्षलवादी ठार ; 1 पी.एस.आय.जखमी.  


★ C - 60 पथकाचे जवान व नक्षलवादी यांच्यात 6 तास चालली चकमक.


एस.के.24 तास

 

एटापल्ली : जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमालगतच्या जंगल परिसरात १७ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस - नक्षलवाद्यांत चकमक उडाली. यात १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले.एक पोलीस उपनिरीक्षक जखमी आहे. दरम्यान,उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर असतानाच घनदाट जंगलात ही चकमक उडाली.


अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे स्टील निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व उद्योगमंत्री उदय सामंत हेलिकॉप्टरने आले होते.


एटापल्ली तालुक्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या वांडोळी जंगल परिसरात ‘सी-६०’ पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना इंटला गावाजवळ जंगलात दबा धरून असलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. 


पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले.त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक,नीलोत्पल यांनी दिली. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम तीव्र केल्याचे त्यांनी सांगितले.


सहा तास चालली चकमक : - 

जवान व नक्षलवाद्यांमध्ये सहा तास थरारनाट्य चालले. रात्री ८ वाजता चकमक थांबली. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोधमोहिमेत १२ माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी ३ एके-४७, २ बंदुका, १ कार्बाईन, १ एसएलआर, ७ ऑटोमोटिव्ह शस्त्रे आढळून आली आहेत. यानंतर तेथे नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.

दोन विभागीय समिती सदस्यांचा समावेश :-

मृत झालेल्या १२ नक्षलवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. यात टिपागड (ता. कोरची) दलमच्या विभागीय समितीचे सदस्य लक्ष्मण आत्राम, विशाल आत्राम यांचा समावेश आहे. उर्वरित दहा जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.


उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले ५१ लाखांचे बक्षीस : - 

गेल्या काही वर्षांतील ही सर्वांत मोठी चकमक असून गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली आहे. त्यांनी सी-६० जवानांना ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.


नक्षलवादी अस्वस्थ : - 

गडचिरोली पोलिसांच्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे मागील दोन वर्षांत अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. शिवाय काही जहाल नक्षल्यांना चकमकीत पोलिसांच्या गोळीचा निशाणा व्हावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात नक्षल चळवळीची पिछेहाट सुरू आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !