राजुरा येथे गोळीबार 1 ठार ; चंद्रपूर जिल्ह्यात एका महिन्यात घडली तिसरी घटना.
एस.के.24 तास
राजुरा : राजुरा शहरातील गजबजलेल्या आसिफाबाद मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलासमोर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या ए.टी.एम.जवळ शिवज्योतसिंग देवल वय,28 वर्ष या युवकावर मोटर सायकलने आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला.या गोळीबारात देवल यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान,जुलै महिन्यात जिल्ह्यात गोळीबाराची ही तिसरी घटना असल्याने पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हल्लेखोर मोटार सायकलने घटनास्थळी आले व त्यांनी गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी पहिली गोळी झाडताच शिवज्योतसिंह देवल हा युवक तेथील ओम जनरल स्टोअर्समधून पळून मागे मोकळ्या जागेत गेला. मात्र दोन्ही हल्लेखोर युवकाच्या मागे धावत गेले आणि तेथे जवळून त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात शिवज्योतसिंग देवल याचा जागीच मृत्यू झाला.
या हल्ल्यात ठार झालेला देवल हा युवक ट्रक चालक असल्याचे कळले.या घटनेतील मृतक हा मागील वर्षी एका नेत्याच्या पत्नीवर झालेल्या गोळीबारातील आरोपीचा मोठा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन राजुरा उपजिल्हा रूग्णालयात हलविले.घटना घडताच पोलीस बंदोबस्त चोख करण्यात आला असून पोलिसांनी युद्धपातळीवर आरोपींचा शोध सुरू केला आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन घटनास्थळी दाखल झाले आहे.
या महिन्यातील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. 4 जुलै रोजी चंद्रपूर शहरातील रघुवंशी संकुलातील मनसे कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष,अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार झाला होता.या हल्ल्यात अंधेवार जखमी झाले होते.त्यानंतर 7 जुलै रोजी बल्लारपूर येथे मालू कापड विक्रेते यांच्या दूकानात दोन व्यक्तींनी पेट्रोल बॉम्ब फेकून गोळीबार केला होता. त्यात एक व्यक्ती जखमी झाला होता.
या दोन्ही प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अजूनही यश आलेले नाही.अशातच ही तिसरी घटना घडल्याने पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान बल्लारपूर येथील आरोपी मिळत नसल्याने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथील ठाणेदार शेख यांच्या बदलीची मागणी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
तर राजुरा गोळीबार प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करा अशी मागणी पालकमंत्री,सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार,आमदार,सुभाष धोटे यांनी केली आहे.