चंद्रपूर मध्ये राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू.

चंद्रपूर मध्ये राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू.


एस.के.24 तास


चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस सह संपूर्ण महाविकास आघाडीत उत्साह संचारला आहे, तर भाजपच्या नेतृत्वातील महायुतीनेही पराभव बाजूला सारत विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. 


सर्वच पक्षांकडून जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांवर दावा केला जात आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुकांचीही संख्या चांगलीच वाढली आहे.


बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपकडेच राहणार असून येथून राज्याचे वनमंत्री आमदार,सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढणार,हे स्पष्टच आहे.दुसरीकडे, महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने या मतदार संघावर दावा केला आहे.जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य स्वत: येथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. बल्लारपूर मतदार संघाची निर्मिती झाली तेव्हापासून येथे काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढत आला आहे.दुसरीकडे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनीही लढण्याची तयारी सुरू केली आहे.


चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रीय पक्षाकडून लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जोरगेवार महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होतात की महाविकास आघाडीचा हात धरतात, की पुन्हा अपक्षच लढतात,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महायुतीकडून लढण्यासाठी इतरही नेते इच्छुक आहेतच. महाविकास आघाडीतील आरपीआय खोब्रागडे गटाचे बाळू खोब्रागडे यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसने ही जागा आरपीआयसाठी सोडावी, अशी त्यांची इच्छा आहे. खोब्रागडे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार नाहीत. यामुळे जागावाटपाच्या वाटाघाटीत ही जागा महायुती व महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला सुटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


वरोरा विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या खासदार धानोरकर यांचा आहे. हा मतदार संघ काँग्रेसकडेच राहील,अशी शक्यता आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे येथून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी शिंदे यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. २०१९ मध्ये हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडे होता. 


तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेचे आता दोन गट पडले आहेत. एक गट महाविकास आघाडीत, तर दुसरा गट महायुतीत आहे. यामुळे दोन्ही शिवसेनेतील नेते या मतदारसंघावर दावा करू शकतात, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीत आणि भाजपप्रणीत महायुतीत या मतदारसंघावरून रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


चिमूर व ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे भाजप व काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता आहे. चिमूर येथून भाजपचे किर्तीकुमार भांगडिया आणि ब्रम्हपुरीतून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आमदार आहेत.विद्यमान आमदारांचे मतदारसंघ त्यांनाच मिळतील.मात्र,या मतदारसंघांवरही मित्रपक्ष दावा करू शकतात,असे सुप्त आवाजात बोलले जात आहे.


राजुरा विधानसभा मतदार संघ काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे यांच्याकडेच राहील,असा राजकीय विश्लेषकांचा प्राथमिक अंदाज आहे. महाविकास आघाडीतील इतर पक्षांचाही या मतदारसंघावर डोळा आहे.दुसरीकडे, महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे येतो का, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही हा मतदारसंघ आपल्या पक्षाच्या वाट्याला यावा, यासाठी प्रयत्नरत आहेत. एकंदरीत, जिल्ह्यातील या सहाही मतदारसंघांवरून महाविकास आघाडी आणि महायुतीत रस्सीखेच रंगण्याची चिन्हे आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !