लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांना सुपारी देण्याचा प्रयत्न. - प्रतिभा धानोरकर यांचा आरोप

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांना सुपारी देण्याचा प्रयत्न. - प्रतिभा धानोरकर यांचा आरोप


एस.के.24 तास


चंद्रपूर : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार घरी बसून निवडून यावे तथा लोकसभेची उमेदवारी मला मिळू नये यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी राजुराचे आमदार सुभाष धोटे यांना ‘" सुपारी " देण्याचा प्रयत्न केला. पैशाने मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.मात्र आमदार धोटे विकल्या गेले नाही,अशा शब्दात नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वपक्षीय नेत्यांचा समाचार घेतला. यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.


राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मुलीला उमेदवारी मिळत नाही हे लक्षात येताच जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे केली होती.


दरम्यान त्यावेळी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. धानोरकर यांनी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजार मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या विजयानंतर नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सत्कार सोहळे जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहेत.


बुधवारी राजुरा येथे नवनिर्वाचित खासदार धानोरकर यांच्या ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषानिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. राजुरा येथील गांधी चौकात सायंकाळी ७.३० वाजता आयोजित या भव्य सत्कार सोहळा व राजुरा तालुका काँग्रेस समिती कार्यालय गांधी भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाला खासदार प्रतिभा धानोरकर,


 राजुराचे आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील लोकांनी मला उमेदवारी मिळू नये यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केल्याची टीका केली.


राजुराचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना सुपारी देण्याचा प्रयत्न देखील झाला. काही लोकांनी त्यांना पैशाची देखील ऑफर दिली. केवळ धानोरकर यांना तिकीट भेटायला नको, वेळप्रसंगी तुम्ही लोकसभेची उमेदवारी घ्या असेही सांगण्यात आले. केवळ मुनगंटीवार घरी बसून निवडून यावे यासाठीच हे सर्व सुरू होते असेही खासदार धानोरकर म्हणाल्या.


आमदार सुभाष धोटे अगदी सुरुवातीपासून माझ्या सोबत होते. चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवर प्रतिभा धानोरकर यांचा नैसर्गिक हक्क आहे. त्यामुळे मी कायम धानोरकर यांच्या सोबत राहील हा शब्द सुभाष धोटे यांनी दिला होता. धोटे यांनी दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळला व धोटे विकल्या गेले नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. त्यामुळे आता आमदार सुभाष धोटे यांना मंत्रीपद मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही खासदार धानोरकर म्हणाल्या.


लोकसभा मतदारसंघाची खासदार म्हणून सर्वांच्या तिकिटा मलाच वाटायच्या आहेत. तिकीट तर देईलच आमदार धोटे यांना मंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न राहणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !