रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी ४ वर्षीय आर्यन तलांडी चिमुकल्याचा मृत्यू. ★ गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे ; लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष.

रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी ४ वर्षीय आर्यन तलांडी चिमुकल्याचा मृत्यू. 


गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे ; लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष.


एस.के.24 तास

अहेरी: अचानक प्रकृती खालावल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. आर्यन अंकित तलांडी वय,4 वर्ष रा.कोरेली ता.अहेरी जिल्हा, गडचिरोली असे मृत बालकाचे नाव आहे. 


ही घटना 24 जून रोजीची असून तीन दिवसांनंतर उघडकीस आली.यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.


अहेरी तालुक्यातील कोरेली या दुर्गम येथील रहिवासी असलेले अंकित तलांडी यांच्या आर्यन या ४ वर्षीय मुलाची 23 जून रोजी मध्यरात्री प्रकृती खालावली होती.पोटदुखीचा त्रास होता. दरम्यान, मध्यरात्री 5 किमी लांब असलेल्या पेरमिली आरोग्य केंद्रात त्याला उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आर्यनवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर आर्यनला पालकांनी घरी कोरेलीला परत नेले. 


24 जूनला पहाटे त्याला अधिक त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा पेरमिली आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला अहेरी येथे नेण्यास सांगितले. परंतु वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालक आर्यनला घेऊन बसने अहेरीसाठी निघाले. दरम्यान, वाटेत त्याची प्रकृती अधिक खालावली.बाब बस चालक गौरव आमले यांना लक्षात येताच त्यांनी बस थेट आलापल्ली येथील आरोग्य केंद्रात नेली. 


परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. यावेळी आर्यनसोबत त्याचे आजी व आजोबा होते. तर वडील दुचाकीने यायला निघाले होते. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने पालकांनी रुग्णालय परिसरात एकच टाहो फोडला होता. 


आरोग्य विभागाच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे या भागात दरवर्षी अशा हृदयद्रावक घटना समोर येत असतात पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व्यवस्थेत सुधारणा होण्याऐवजी अधिकच बिघाड होत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे येथील आदिवासीच्या जीवाची किंमत नाही का, असा प्रश्न विचारल्या जात आहे.


१२ तासांपासून उपचार शेवटच्या क्षणी रेफर : - 

आर्यनवर 23 जून च्या रात्रीपासून उपाचार सुरु करण्यात आले होते. शेवटच्या क्षणी प्रकृती अधिक खालावल्याने त्याला अहेरीला " रेफर " करण्यात आले.उशीर न करता आधीच त्याला अहेरीला पाठविले असते आणि रुग्णावाहिका वेळेवर उपलब्ध झाली असती तर आर्यनचा जीव वाचला असता असे पालकांचे म्हणणे आहे. 


या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांना दूरध्वनीवर दोनदा संपर्क केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.मागील वर्षी देखील असाच प्रसंग उघडकीस आला होता.दुसरीकडे सुरजागड लोहाखाणीतील अवजड वाहनामुळे या परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी चंद्रपूर, गडचिरोली जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लगतो.





#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !