राग सासूवर काढून तिचा निर्घृण खून केल्याबद्दल जावयास जन्मठेप.
एस.के.24 तास
सोलापूर : घटस्फोट झालेल्या पत्नीला पुन्हा नांदण्याचा आग्रह केला असता त्यास पत्नी नकार देत असल्यामुळे त्याचा राग सासूवर काढून तिचा निर्घृण खून केल्याबद्दल जावयाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे.मोहम्मह शरीफ ऊर्फ गुड्डू चाँदपाशा पटेल वय,38 वर्ष रा.अभिषेक नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी या खटल्याचा निकाल सुनावला.
आरोपी मोहम्मद शरीफ याचा समरीन हकीम पीरजादे या तरूणीबरोबर १४ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. परंतु पुढे काही वर्षांनी किरकोळ कारणांवरून तो समरीन हिला मारझोड करू लागला. या असह्य त्रासामुळे कंटाळून समरीन ही अक्कलकोट रस्त्यावरील संगमेश्वर नगरात माहेरी येऊन राहू लागली.चार वर्षापूर्वी त्यांचा रीतसर घटस्फोटही झाला होता. समरीन ही माहेरी राहात असताना खासगी नोकरी करीत स्वतंत्रपणे हाॕस्टेलमध्ये राहू लागली.
आरोपी मोहम्मद शरीफ याने समरीन हिला पुन्हा वैवाहिक संबंध प्रस्थापित होण्यासाठी आग्रह धरत होता. त्यास समरीनसह तिच्या माहेरच्या मंडळींनी तीव्र विरोध केल्यामुळे मोहम्मद शरीफ याने व्यवसायाने वकील असलेला मेव्हणा सद्दाम पीरजादे यास बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याने घटस्फोटीत पत्नीकडे पुन्हा नव्याने संसार थाटण्यासाठी लकडा लावला होता.
दरम्यान, ४ आॕक्टोंबर २०२१ रोजी मोहम्मद शरीफ हा समरीन हिच्या माहेरी जाऊन लोखंडी राॕडच्या साह्याने हल्ला केला. घराची तोडफोड करीत असताना त्याची सासू मुमताज पटेल वय,60 वर्ष ही घरातून बाहेर येऊन त्यास रोखण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा मोहम्मद शरीफ याने तिला उद्देशून, तू माझ्या पत्नीला पुन्हा नांदविण्यास पाठविणार आहेस की नाही, असा सवाल केला. त्यावर तिने नकार देताच मोहम्मद शरीफ याने हातातील लोखंडी राॕडने सासू मुमताज हिच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. यात ती गंभीर जखमी होऊन मरण पावली. हल्ला करून मोहम्मद शरीफ याने स्वतःची दुचाकी तेथेच ठेवून गुन्ह्यात वापरलेले लोखंडी राॕड घेऊन थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांनी पूर्ण करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील १५ साक्षीदार तपासले. यात प्रत्यक्ष नेत्र साक्षीदारासह पोलीस ठाण्यात आरोपी मोहम्मद शरीफ हा लोखंडी राॕडसह हजर झाला असता त्याचे पोलीस ठाण्यातील सिसीटीव्ही कॕमे-यात झालेले चित्रण, वैद्यकीय पुरावा आदी बाबी महत्वाच्या ठरल्या. आरोपीतर्फे ॲड. एच. एस. बडेखान यांनी बाजू मांडली.