नक्षलवादी चळवळीला हादरा ; जहाल नक्षलवादी नेता गिरीधर याचे पत्नी सह आत्मसमर्पण.

नक्षलवादी चळवळीला हादरा ; जहाल नक्षलवादी नेता गिरीधर याचे पत्नी सह आत्मसमर्पण.


एस.के.24 तास


गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य समितीचा सदस्य तसेच गडचिरोली जिल्ह्याचा सूत्रधार नांगसू मनसू तुमरेटी उर्फ गिरीधर व त्याची पत्नी संगीता उर्फ ललिता चैतू उसेंडी या दोघांनीही शनिवारी (२२ जून) उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गडचिरोली पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पण केले. दोघांवरही एकूण ५० लाखांच्यावर बक्षीस होते. यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसल्याचे सांगितले जात आहे.


१९९६ पासून नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेल्या गिरीधरने एटापल्ली दलममध्ये सदस्य म्हणून सुरवात केली. २००२ मध्ये त्याच्यावर भामरागड दलम कमांडर म्हणून पहिल्यांदा सर्वात मोठी जबाबदारी सोपविण्यात आली. तेंव्हापासून तो गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलवादी चळवळीतील प्रमुख नेता म्हणून ओळखल्या जाऊ लागला.त्यानंतर विभागीय समिती सदस्य, कंपनी चारचा उपकमांडर पदावर काम केले. २०१५ साली नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य म्हणून नियुक्ती झाली. सोबत पश्चिम उपविभागाचा प्रमुख म्हणून नेतृत्व केले. 


२०२१ मध्ये झालेल्या मार्दीनटोला चकमकीत जहाल नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्यानंतर त्याच्याकडे गडचिरोली नक्षलवादी चळवळीची सूत्रे सोपाविण्यात आली होती. तर त्याची पत्नी संगीता ही २००६ साली कसनसूर दलममध्ये प्रवेश केला होता. ती सध्या भामरागड दलममध्ये विभागीय सदस्य म्हणून कार्यरत होती. या दोघांवरही महाराष्ट्र शासनाने अनुक्रमे २५ आणि १६ लाखांचे बक्षीस ठेवले होते. तर छत्तीसगडमध्ये देखील यांच्यावर लाखांचे बक्षीस होते.


मागील दोन वर्षांपासून गडचिरोली पोलिसांच्या " सोशल पोलिसिंग " मुळे अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षल चळवळीतील प्रमुख नेत्यांमध्ये गिरीधरचे नाव होते.त्याच्या आत्मसमर्पणाने नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला आहे. यावेळी गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि पोलीस अधिकारी उपास्थित होते.


गृहमंत्र्यांनी संविधान हाती देत केला सत्कार : - 

गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मसमर्पित नक्षल कुटुंबाचा मेळावा भरविण्यात आला होता. यात गिरीधर आणि त्याची पत्नी संगीताने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्य प्रवाहाचा मार्ग निवडला. यावेळी फडणवीस यांनी दोघांच्या हातात संविधानाची प्रत देत त्यांचा सत्कार केला. सोबतच त्यांना आत्मसमर्पण योजनेअंतर्गत शासनाकडून १५ व ८ लाख रुपयांचा सन्मान निधी देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांचे कौतुक केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !