मतदान नंतर चाचणीचे कल लक्षात घेता महायुतीला विदर्भात मोठा धक्का बसण्याची शक्यता ?



मतदान नंतर चाचणीचे कल लक्षात घेता महायुतीला विदर्भात मोठा धक्का बसण्याची शक्यता ?



एस.के.24 तास


नागपूर : मतदानोत्तर चाचणीचे कल लक्षात घेता महायुतीला विदर्भात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विदर्भात फारशी संघटनात्मक ताकद नसलेल्या शिंदेंच्या शिवसेनेवर टाकलेला विश्वास महायुतीची कामगिरी खराब करण्यास कारणीभूत ठरला आहे, असा निष्कर्ष या सहज काढता येतो.


मराठा आरक्षणामुळे ओबीसींमध्ये असलेली नाराजी,दलित व मुस्लीम समुदायांचे महाविकास आघाडीला झालेले मतदान लक्षात घेता यावेळी भाजपला म्हणजेच महायुतीला विदर्भात गेल्या वेळची कामगिरी कायम राखता येणार नाही असा अंदाज वर्तवला जात होता.त्याचेच प्रतिबिंब आज जाहीर झालेल्या चाचण्यांमध्ये दिसून आले.


विविध वृत्तवाहिन्या व संस्थांनी केलेल्या पाहणीनुसार नागपुरातून केंद्रीय मंत्री,नितीन गडकरी सहज विजयी होतील. त्यांचे मताधिक्य मात्र घटेल.भाजपपेक्षा वैयक्तिक लोकप्रियतेचे बळ यामागे कारणीभूत असल्याचे दिसते. 


राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात पराभूत होतील असा अंदाज काही वाहिन्यांनी वर्तवला आहे तर काहींनी दोन ते तीन टक्क्यांच्या फरकाने ते जिंकतील असे म्हटले आहे.ही लढत अटीतटीची झाली होती व काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आमदार पत्नी प्रतिभा यांना अनुकूल वातावरण होते.येथे कुणबी समाजाची मते निर्णायक ठरल्याचे दिसते.


वर्धेत भाजपचे रामदास तडस बाजी मारतील असे हा कल सांगतो.नव्या चिन्हावर अमर काळेंना रिंगणात उतरवण्याचा फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झालेला दिसत नाही. 


गडचिरोलीत काँग्रेसचे नामदेव किरसान बाजी मारतील.हा अशोक नेते पेक्षा भाजपसाठी मोठा धक्का असेल.


भंडाऱ्यात भाजपचे सुनील मेंढे पून्हा विजयी होतील.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसाठी हा मानहानीकारक पराभव असेल.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने विदर्भात रामटेक, यवतमाळ व बुलढाणा या तीन जागा लढवल्या होत्या. यापैकी दोन ठिकाणी त्यांचा पराभव होईल असा दावा चाचण्यांमध्ये करण्यात आला.


यातील यवतमाळ व बुलढाण्यात उद्धव ठाकरेंच्या सेनेला तर रामटेकमध्ये शिंदेसेनेला विजयाची संधी दाखवण्यात आली आहे.असा निकाल लागला तर तो शिंदेसाठी मोठा धक्का असेलच, पण भाजपला त्याहून मोठा झटका असेल.


अकोल्यात मतविभाजनाचा फायदा भाजपचे अनुप धोत्रेंना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे काँग्रेसच्या पराभवासाठी वंचितचे प्रकाश आंकेडकरांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. 


अमरावतीत यावेळी भाजपकडून लढणाऱ्या नवनीत राणा विजयी होतील असे हा कल सांगतो. येथे दोन तपानंतर प्रथमच लढणाऱ्या काँग्रेससाठी व या पक्षाच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !