चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील चनाखा गावाजवळ रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू.
एस.के.24 तास
राजुरा : वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गातून जाणारे प्रकल्प त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील चनाखा गावाजवळ रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला.ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. यापूर्वी देखील या मार्गावर तीन वाघ मृत्युमुखी पडले आहेत.
चंद्रपूरवरुन हैद्राबादकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर ही घटना घडली. या मार्गावर सातत्याने रेल्वेखाली येऊन वन्यप्राणी मृत्युमुखी पडतात.दोन वर्षांपूर्वी बल्लारपूर ते काझीपेठ जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर राजूरा तालुक्यातील चनाखा - सातरी गावाजवळ वनखात्याच्या कक्ष क्र. १५८ लगतच्या रेल्वे रुळावर ऑगस्ट २०२२ मध्ये एक वाघ मृत्युमुखी पडला.
रेल्वे कर्मचाऱ्याला गस्तीदरम्यान तो वाघ मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. पहाटेच्या सुमारास ही धडक बसली. त्याआधीही दोन महिन्यापूर्वी याठिकाणी एक वाघ मृत्युमुखी पडला होता. आतापर्यंत या रेल्वेमार्गावर तीन वाघ मृत्युमुखी पडले.तर अनेक लहानमोठे वन्यप्राणीदेखील गेले.
वन्यप्राण्यांचा हा अधिवास असून या रेल्वे मार्गावर तीन ते चार ठिकाणाहून वन्यप्राणी रस्ता ओलांडतात. वाघाच्या मृत्युनंतर वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट या संस्थेने या मार्गावर वनखात्याला उपशमन योजना तयार करण्यास सांगितले.तर उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, त्यानंतर या उपशमन योजनांचे काय झाले हे कुणालाही ठाऊक नाही.
बिबट्याच्या या मृत्यूनंतर वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गातून जाणारे रेल्वे मार्ग आणि त्यावरील उपशमन योजना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत.अलीकडेच वनखात्याने या परिसरात जोगापूर येथे पर्यटन सुरू केले. त्याच्या मागच्या परिसरातच ही घटना घडली. रेल्वेच्या धडकेत वाघ व इतर वन्यप्राणी नेहमीच मृत्युमुखी पडत आहेत. अशा घटना परत घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे मत वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर देखील रेल्वेच्या धडकेत अनेकदा वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. वन्यप्राण्यांच्या अधिवासातून जाणारे प्रकल्प सातत्याने वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आले आहेत. मात्र, त्यानंतरही जंगलालगत किंवा जंगलातून प्रकल्पांना मान्यता दिली जात आहे. रेल्वेमार्ग हे आधीपासून असले तरीही त्यावर उपशमन योजना करण्याची आवश्यकता आहे.
भारतीय वन्यजीव संस्था,वन्यजीव संवर्धन संस्था यासारख्या अनेक संस्था या उपशमन योजना देतात. अंमलबजावणीत सातत्य नसल्याने त्याचा फटका वाघ, बिबट यासह इतरही वन्यप्राण्यांना बसत आहे. तीन वाघ आणि बिबट्याचा बळी घेणाऱ्या या रेल्वेमार्गावर आता तरी उपशमन योजना होणार का असा प्रश्न वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.