निवडणूक बंदोबस्त आटपून गडचिरोलीकडे परत येणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या वाहनाला अपघात
★ भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने (सीआरपीएफ) च्या दोन जवानांचा मृत्यू
एस.के.24 तास
गडचिरोली : बीड येथील निवडणूक बंदोबस्त आटपून गडचिरोलीकडे जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या वाहनाला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. ही धक्कादायक घटना धामणगावजवळील समृद्धी महामार्गावर गुरूवारी दुपारी घडली.
या अपघातात एक जवान जागीच तर दुसऱ्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गिरीष कुमार वय,42,रा.केरळ आणि मिठा तेजश्वरराव वय,36 वर्ष रा.आंध्रप्रदेश अशी मृत जवानांची नावे आहेत.तर अब्दुल रफ असे जखमी जवानाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, लोकसभा निवडणूक मतमोजणी बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान बीड येथे आले होते. बंदोबस्त आटोपल्यानंतर जवानांचे वाहन बीड येथून गडचिरोलीकडे निघाले होते.
अश्यात गुरूवारी दुपारी धामणगाव जवळील समृध्दी महामार्गावर भरधाव ट्रकने सीआरपीएफ जवानांच्या वाहनाला मागच्या बाजूने धडक दिली. या धडकेत मिठा तेजश्वरराव या जवानाचा जागीच मृत्यू झाला,तर गिरीष कुमार आणि अब्दुल रफ गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान रूग्णवाहिकेच्या मदतीने जखमी जणांना यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सायंकाळी गंभीर जखमीमधील गिरीष कुमार या जवानाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अब्दुल रफ यांच्यावर उपचार सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी रूग्णालयात भेट देवून जखमी जवानांची चौकशी केली.शवविच्छेदनानंतर मृत जवानांचे शव नागपूर विमानतळावरून त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिली.
या अपघातातील जखमींना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्यानंतर प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत जवानांना तत्काळ उपचार करण्यासाठी तत्परता दाखवली. स्वतः जिल्हाधिकारी रुग्णालयात पोहचले.
त्यांनी जखमी जवानांची आस्थेने चौकशी केली. या जवानांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.मृत जवानांचे मृतदेह त्यांच्या मुळ गावी पाठविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी यंत्रणेस कामी लावले.गडचिरोली सीआरपीएफशी समन्वय साधून परिस्थिती हाताळली.
दरम्यान, समृध्दी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढल्याने या महामार्गावर जागोजागी अपघात नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.