महाडीबीटी पोर्टल वर शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन.
एस.के.24 तास
चंद्रपूर : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणा-या बाबीकरीता शेतक-यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन 2024-25 मध्ये योजनेंअंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये खालील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस करीता अर्ज करण्याचा कालावधी 30 जून 2024 पर्यंत आहे. तर मेटाल्डीहाईड सोयाबीन करीता 23 जून 2024 पर्यंत अर्ज सादर करावयाचा आहे.
वरील निविष्ठांचा पुरवठा करण्याकरीता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दिनांक 12 जून 2024 पासुन सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खाते या टाईल अंतर्गत शेतक-यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईड वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.