अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे अंगणात झोपलेल्या व्यक्तीला अज्ञातांनी पेट्रोल टाकून पेटवले
एस.के.24 तास
गडचिरोली : घरासमोरील अंगणात खाटेवर झोपून असलेल्या व्यक्तीच्या अंगावर मध्यरात्री अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना २ जून रोजी अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त छल्लेवाडा या गावांत उघडकीस आली.चरणदास गजानन चांदेकर वय,48 वर्ष असे जळालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरु आहे.
वाढलेल्या तापमानामुळे गडचिरोलीच्या घनदाट जंगलातील गावातही उन्हाच्या झळा बसत आहे.यामुळे हैराण नागरिक रात्री घरापुढील अंगणात झोपतात. जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात येत असलेल्या नक्षलग्रस्त छल्लेवाडा येथील रहिवासी असलेले चरणदास चांदेकर सुद्धा घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात आरोपीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली व पळून गेले.
यावेळी त्यांच्या बाजूला दुसऱ्या खाटेवर झोपून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना ही बाब समजताच त्यांनी आग विझवली.परंतु तोपर्यंत आगीमुळे चरणदास यांना गंभीर इजा झाली होती.त्यांना उपचारासाठी चंद्रपूर ला हलवण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरु आहे.या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे.
गावातील काही लोकांवर संशय ?
चरणदास यांना पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रेपनपल्ली पोलिसांनी प्राथमिक गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.गावात चांदेकर यांच्याशी कुणाचा वाद नव्हता.
त्यामुळे इतक्या क्रूरपणे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.दरम्यान पोलिसांना गावातील काही लोकांवर संशय असून लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल,अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.