भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी, अशोक बागुल यांचा कारनामा
★ तरुणी तक्रार करायला गेली मात्र पोलीस अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली ; राजकीय वातावरण तापले
एस.के.24 तास
भंडारा : भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी तक्रार करायला आलेल्या पीडित तरुणीला शरीर सुखाची मागणी केली.हे प्रकरण आता त्यांना चांगलेच भोवणार असल्याची चिन्हे आहेत.विरोधी पक्षनेत्यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणा असल्याचे म्हटले आहे.शरद पवार गटाचे आमदार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
गृहखात्याने या प्रकरणाची चौकशी करावी,अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आधार घेत विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याची तयारी केल्याचे दिसत आहे.
लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे अभियांत्रिकीच शिक्षण घेत होती.तिथे तिची ओळख एका तरूणा सोबत झाली.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.प्रेमात दोघांनी ही आणाभाका घेतल्या आणि गुपचूप लग्नही केले.
काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला त्याच्यावर संशय आला त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली.त्यावेळी त्याने तिला नकार दिला.खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र, सुदैवाने ती बचावली.
त्यानंतर तिने प्रियकराविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी,अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा उपविभागीय पोलीस बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले.
तरुणीला पोलीस अधिकाऱ्याच्या उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली.त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली. घाबरलेल्या तरुणीने याची माहिती सामाजिक कार्यकर्ते,परमानंद मेश्राम यांना दिली.
मेश्राम यांना पीडितेला सोबत घेत पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तरूणीच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसांनी अशोक बागुल यांच्या विरोधात ३५४ अ, ५०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात चौकशी सुरु झाली आहे. चौकशीचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला जाणार आहे,असे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले.
अधिकारी निलंबित होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे : -
भंडारा च्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापू लागले आहे.हे बघता पोलीस उपमहानिरीक्षक कडून माहिती मागवली गेली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार यात शंका नाही.अधिकारी निलंबित होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.