भद्रावती तालुक्यातील बरांज येथे काँग्रेस खा.प्रतिभाताई धानोरकर यांच्या भावाकडून कर्नाटक एम्टाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ ; कार्यकर्त्यां कडून मारहाण.

भद्रावती तालुक्यातील बरांज येथे काँग्रेस खा.प्रतिभाताई धानोरकर यांच्या भावाकडून कर्नाटक एम्टाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ ; कार्यकर्त्यां कडून मारहाण.


एस.के.24 तास


भद्रावती : काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समक्ष त्यांचा सख्खा भाऊ प्रवीण काकडे आणि कार्यकर्त्यांनी कर्नाटक एम्टा कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना आई बहिणीवरून शिवीगाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक व तेवढाच गंभीर प्रकार आज भद्रावती येथील बरांज येथे घडल्याने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे पोलिसांसमोर अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात खासदार,प्रतिभा धानोरकर यांचे भाऊच आघाडीवर होते.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.


निवडून येताच खासदाराच्या भावाने हा पराक्रम केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. तर या घटनेचा व्हिडिओ आता समाज माध्यमातून समोर आल्याने खासदार धानोरकर यांच्या प्रतिमेला चांगलाच धक्का पोहोचला.


चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे. ही खाण कर्नाटक सरकारची आहे. या खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांना मोठा फटका बसू लागला आहे. सोबतच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांना घेवून खासदार प्रतिभा धानोरकर व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी आज बुधवार १९ जून रोजी खाण परिसरात गेल्या होत्या. त्यांच्यासोबत भाऊ प्रवीण काकडे आणि असंख्य कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त देखील होते.


अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच खासदार धानोरकर यांच्याऐवजी त्यांचा भाऊ प्रवीण काकडे हा स्वत: लोकप्रतिनिधी असल्याच्या अविर्भावात अधिकाऱ्याला विचारपूस करित होता. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांशी चर्चा करता-करता प्रवीण काकडे यांनी शिवीगाळ केली आणि त्याचवेळी एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात थापड लगावली. यानंतर एकच गोंधळ उडाला.


अधिकाऱ्यांना सर्वांनी आई बहिणीवरून शिवीगाळ करणे सुरू केले. यावेळी उपस्थित पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याला फार यश आले नाही. यावेळी एकच गोंधळ उडाल्याने व संतप्त जमाव अधिकाऱ्यांना मारहाण करतो की काय अशी स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांच्या मदतीने अधिकाऱ्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले.


अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची, मागण्या ठेवण्याची एक पद्धत असते, शिष्टाचार असतो, पण यावेळी तो पाळण्यात आला नाही. खुद्द खासदारांच्या सख्ख्या भावानेच शिवीगाळ करायला सुरुवात केल्याने निकाल लागताच मुजोरी आल्याची चर्चा या परिसरात रंगू लागली आहे. दरम्यान, यासंदर्भात कर्नाटक एम्टा खाण व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष जीभकाटे यांनी, यावर बोलण्यास नकार दिला.


दरम्यान अशा घटनांमुळे कोळसा खाणीचे अधिकारी तथा कर्मचारी या भागात काम करायला तयार नाहीत. लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांची अशा प्रकारची दादागिरी व मुजोरी सुरू असल्याने या भागात काम करणारे अधिकारी त्रासले आहेत.


मागील दहा वर्षांपासून भद्रावती – वरोरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व धानोरकर कुटुंबाकडे आहे. २०१४ मध्ये बाळू धानोरकर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये बाळू धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करित चंद्रपूर – वणी - आर्णी या लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. तर प्रतिभा धानोरकर या २०१९ मध्ये वरोरा – भद्रावती विधानसभा मतदार संघाच्या आमदार झाल्या. मागील दहा वर्षांपासून धानोरकर कुटुंबाचे सदस्य लोकप्रतिनिधी असताना त्यांना प्रकल्प ग्रस्तांच्या विविध समस्या सोडविण्यात यश आले नाही. 


प्रकल्पग्रस्त अनेक दिवसांपासून स्वत:च्या मागण्यांसाठी भांडत आहेत. पण या भागाच्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या समस्या सोडविता आल्या नाही. त्यामुळे पाणी नेमके कुठे मुरत आहे, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !