आपत्‍कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या कार्यातून संवेदनशीलता दिसावी. - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ★ जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचा आढावा.

आपत्‍कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या कार्यातून संवेदनशीलता दिसावी. - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


★ जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचा आढावा.


एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो व त्यामुळे पूर येवून अनेक गावांचा संपर्क तुटतो. पावसाळ्यात येणाऱ्या या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे,अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. 

गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नियोजन भवन येथे घेतला.आमदार देवराव होळी,आ.कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय दैने,नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह,जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.निलोत्पल, माजी खासदार अशोक नेते यावेळी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री यांनी आपत्ती काळात प्रत्येक जीव वाचविने हे आपले कर्तव्य असून यासाठी अलर्ट राहून आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे सांगितले. गोसेखुर्द प्रकल्प व श्रीराम सागर बॅरेज या इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रकल्पातून पाणी सोडतांना त्याची पूर्वसूचना मिळावी यासाठी संबंधीत यंत्रणेशी संपर्कात राहावे. जिल्ह्यातील महत्वाचे रस्त्यांची डागडूजी करून ते दुरूस्त करावे.


 पूरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये  नवसंजीवन योजनेअंतर्गत आगावू उपलब्ध करून दिलेले धान्य व साहित्य संबंधितापर्यंत पोहोचले की नाही याची खात्री करणे, विद्युत विभागाने लाईनमन गावातच उपलब्ध राहील याची तपासणी करणे, सर्व धरणांवर सिंचन विभागाद्वारे कार्यान्वित केलेली देखरेख व्यवस्था सुव्यवस्थितपणे कार्यरत आहे का याचीही शहानिशा करण्याचे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे निर्देशही श्री फडणवीस यांनी दिले.


आमदार देवराव होळी व कृष्णा गजभे तसेच माजी खासदार अशोक नेते यांनीदेखील यावेळी आपले प्रश्न मांडले. लोकप्रतिनिधींच्या सूचनांची गांभिर्याने नोंद घेण्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले.जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पूरपरिस्थिती व उपाययोजनांची माहिती दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,राजेंद्र भुयार यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमाला जिल्ह्यातील संबंधीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


किटाळी येथे कॉन्फरन्स हॉल व बॅरेकचे उद्घाटन.


गडचिरोली पोलिस दलाच्या सी.टी.सी. किटाळी येथील कॉन्फरन्स हॉल व महिला पोलिस अंमलदार बॅरेकचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !