पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा ; पत्नी सह दोघे अटकेत.
एस.के.24 तास
वर्धा : देवाच्या साक्षीने सात जन्माची गाठ ज्या पती सोबत बांधली त्याला याच जीवनात संपवून टाकण्याचा थरारक प्रकार उजेडात आला आहे.सध्या पुलगावातील गाडगेनगरात वास्तव्य राहलेला सचिन दीपक घरत हा पत्नी,सारिका सोबत संसार करीत होता.
सचिनला दारूचे व्यसन जडल्याने पती पत्नीत नेहमी खटके उडायचे.त्यातच सारिका व सुरज करलूके यांच्यात प्रेमसंबंध जुळले.पतीचा नेहमी होणारा त्रास तिने सुरज जवळ व्यक्त करीत काही करण्याची सुचविले.अखेर या दोघांनी प्रियकर सुरजचा मानलेला भाऊ विक्की आमझरे यांच्या मदतीने पती सचिन यास कायमचा संपविण्याचा कट रचला.
घटनेच्या दिवशी १६ एप्रिलला सचिन,सुरज व विक्की हे तिघे मिळून नाचणगाव येथील कॅनल वर गेले.तिघांनीही दारू ढोसली.मग मद्यधूंद झालेल्या सचिनला खाली पाडण्यात आले.सुरजने गळा आवळला.मात्र सचिन ठार नं झाल्याने सुरज व विक्कीने मिळून दुपत्त्याने गळा आवळून सुरजच्या नरडीचा घोट घेतला.
मृतदेह वाहनात टाकून तो दुरवर हिवरा कावरे येथील नदीपात्रात फेकून दिला.हा मृतदेह देवळी पोलिसांच्या हाती लागला. त्यांनी १८ एप्रिल रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र त्याच दिवशी पत्नी सारिका हिने पुलगाव पोलिसांकडे पती मिसिंग असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना या बाबतीत संशय वाटला. त्यांनी तपासाची उलट चक्रे फिरविली. तेव्हा हा कट रचून खून केल्याचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले.
नाचणगाव येथे दारू ढोसण्यापूर्वी तिघेही अमरावती जिल्ह्यातील विटाळा येथील बार मध्ये गेले होते. तिथे तिघेही दारू पिऊन सायंकाळी निघाले.सोबत परत दारूची बाटली घेतली. नाचणगाव येथे पोहचताच सचिनला परत दारू पाजली.इथेच त्याच्या जीवाचा अंत केल्याची कबुली आरोपी सुरज व विक्कीने दिली आहे.
त्यांनी या प्रकरणात पत्नी सारिका हिचा असलेला सहभाग नमूद केल्यानंतर तिलाही अटक करण्यात आली आहे.तिने कबुली दिल्यावर पुलगाव पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या.मृत सचिन वय,36 वर्ष हा यवतमाळ जिल्ह्यातील आष्टीचा असून तो पुलगाव येथे राहायला आला होता.तर पत्नी मूळची कळंब येथील तसेच आरोपी सुरज व विक्की हे आपटी येथील आहेत.
दोन दिवसापूर्वी अश्याच एका खून प्रकरणाची उकल १५ दिवसानंतर झाली होती. खुनाचा गुन्हा लपविणे शक्य नसल्याचे वर्धा पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात दाखवून दिले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यात पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे व त्यांच्या चमूतील विनोद रघाटाटे, राजेंद्र हाडके आदिनी यश प्राप्त केले.