2 लाख 60 हजार 410 इतक्या विक्रमी मताधिक्याने काँग्रेस च्या प्रतिभाताई धानोरकर विजयी.
★ भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक राजेंद्र वाढई - उपसंपादक
चंद्रपूर : चंद्रपूर - वणी - आर्णी मतदार संघातून काँग्रेस उमेदवार आमदार,प्रतिभा धानोरकर यांनी 2 लाख 60 हजार 410 इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला.
राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला.आमदार, प्रतिभाताई धानोरकर यांना 7 लाख 18 हजार 410 मते मिळाली तर मुनगंटीवार यांना 4 लाख 58 हजार 4 मते मिळाली.
इतर सर्व 13 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. धानोरकर या विदर्भात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.
एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत धानोरकर यांनी 10 हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आणि ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली.
दुसऱ्या फेरीत धानोरकर 24 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर होत्या. दहाव्या फेरीत त्यांची आघाडी 1 लाख 4 हजार 153 मतांवर गेली. विजयाच्या दिशेने आगेकुच सुरू असल्याचे कळताच धानोरकर मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या. भाजप उमेदवार मुनगंटीवार मतमोजणी केंद्रावर आलेच नाही.प्रत्येक फेरीत धानोरकर यांची आघाडी वाढत असल्याने मतमोजणी केंद्रावरील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
शेवटच्या 28 व्या फेरीत धानोरकर यांची मतांची आघाडी 2 लाख 59 हजार 692 इतकी झाली. " पोस्टल बॅलेट "च्या मोजणीनंतर धानोरकर 2 लाख 60 हजार 406 मतांनी विजयी झाल्या.
सहा विधानसभा मतदारसंघात धानोरकर यांना आघाडी : -
लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात धानोरकर यांना आघाडी मिळाली. या लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वणीचे आमदार संजीव बोंदगुरवार व आर्णीचे डॉ.संदीप धुर्वे यांच्या साठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
काँग्रेसचे मताधिक्य वाढले,भाजपचे घटले : -
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य 1 लाख 58 हजार 903 मतांनी वाढले आहे, तर भाजपचे मताधिक्य 56 हजार 740 मतांनी कमी झाले आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर यांना 5 लाख 59 हजार 507 मते मिळाली होती.
भाजपचे हंसराज अहीर यांना 5 लाख 14 हजार 744 मते मिळाली होती.
अहीर यांनी 2019 च्या पराभवाचा सूड 2024 च्या निवडणुकीत घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.