गडचिरोली गोंडवाना विद्यापीठात तब्बल १.४६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार ; चार लिपिकांचा सहभाग
★ जिल्हा न्यायालयाने आरोपींना 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
एस.के.24 तास
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वित्त विभागात कार्यरत तृतीय श्रेणी तीन लिपिकांनी सिनेट सदस्य,विविध प्राधिकरणांचे सदस्य तसेच प्राध्यापकांच्या प्रवास भत्त्यांच्या देयकाची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात वळती न करता स्वत:च्या खात्यात वळती करून 1.46 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उजेडात आले आहे.
या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी चार लिपिकांवर गुन्हे दाखल करून तिघांना अटक केली. जिल्हा न्यायालयाने 5 जून रोजी या आरोपींना 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, विद्यापीठाने यासंबंधी चौकशी केली असता 1.46 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. याबाबत पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे तक्रार दाखल करण्यात आली. या गैरव्यवहाराची बाब निदर्शनास येताच विद्यापीठ प्रशासनाने योग्य ती पावले उचलत संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कार्यवाही केली असून संबंधित तीनही लिपिकांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
महेंद्रकुमार उसेंडी वय,37 वर्ष,अमित जांभुळे वय,38 वर्ष, अमोल रंगारी वय,36 वर्ष व प्रिया पगाडे या चार आरोपी लिपिकांवर गडचिरोली पोलिसांनी भादंविचे कलम 420, 409 आणि 120 ब अन्वये गुन्हा दाखल केला.
यापैकी प्रिया पगाडे वगळता इतर तीन लिपिक पोलीस कोठडीत आहेत, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अरूण फेगळे यांनी दिली. मोठ्या रकमेचा हा अपहार उजेडात आल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
दोन वर्षांपासून सुरू होता गैरव्यवहार : -
कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी महेशकुमार उसेंडी यांची स्वत:च्या नावाची सहा खाती आहेत. तर तीन लिपिकांची प्रत्येकी एक असे तीन खात्यात रक्कम वळती करण्यात आली. प्रवास भत्त्याच्या देयकाची रक्कम एकूण 9 खात्यात वळती करण्यात आली.
विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत या 9 खात्यात एकूण 1.46 कोटी रुपये वळते करण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे.