भद्रावती येथे भाडेकरू च्या घरात घरमालका च्या मुली - जावयाने केली चोरी ; मुलगी पोलीसांच्या ताब्यात तर जावई फरार.
एस.के.24 तास
भद्रावती : शहरातील गोविंद लेआउट येथे राहणाऱ्या घरातून १५ तोळे सोनं व रोख रक्कम चोरी झाल्याची घटना दिनांक 4 मे रोजी घडली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांच्या तपासात घरमालकाची मुलगी व जावईच या घरपोडीचे चोर निघाल्याने आज गुरुवारला मुलीला अटक करण्यात आली असून जावई फरार आहे.
सविस्तर वृत्त असे की, वैशाली सतीश कारेकर वय २८ वर्ष, सतीश कारेकर वय ३८ वर्ष राहणार वणी हल्ली मुक्काम भद्रावती असे आरोपीचे नाव असुन फिर्यादी महेश माशीरकर हे मंदा वरखडे राहणार गोविंद लेआऊट यांच्या घरी भाडयाने राहतात घटनेच्या दिवशी महेश यांचे आई- वडील बाहेर गावी गेले होते व महेश हा काही कामानिमित्त घरातील दरवाज्याला कुलुप न लावता काही वेळासाठी बाहेर गेला. ही संधी साधुन आरोपींनी किरायेदराच्या घरात प्रवेश करून कपाटातून 15 तोळे सोनं व रोख रक्कम ७ हजार लंपास केले.
महेश घरी आल्यावर त्याला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घरी शोधाशोध करून तसेच शेजारी चौकशी करूनही चोरीचा सुगावा न लागल्याने त्याने दिनांक 5 मे रोजी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार बिपिन इंगळे यांनी तपास सुरू करून घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज बघितले मात्र घटनेच्या वेळी बाहेरील कोणी व्यक्ती घरात प्रवेश करताना किंवा जाताना दिसला नाही त्यानंतर पोलिसांना घरमालकावर संशय आल्याने त्यांनी चौकशी केली अखेरीस वैशालीला पोलिसी हिसका दाखवताच तिने चोरीची कबुली दिली.
वैशालीला अटक करण्यात आली असून तिचे कडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील दुसरा आरोपी सतीश फरार आहे. सदर कारवाई ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सपोनी विरेंद्र केदार, गजानन तुपकर, अनुप आष्टूनकर, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुधरी, जगदीश झाडे, योगेश घाटोळे यांनी केली.