खेमदेव कन्नमवार यांच्या लेखणीतून... रयतेची कणव असलेली राणी,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर.


खेमदेव कन्नमवार यांच्या लेखणीतून...

रयतेची कणव असलेली राणी,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर.


एस.के.24 तास

          

चंद्रपूर : भारत मातेच्या उदरात जन्मलेल्या काही स्त्रियांनी स्वताच्या पराक्रमाने व नेतृत्व शैलीने इतिहासाच्या पानात आपले नाव अजरामर केले आहे. 

      

नेतृत्वाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा कठोरता आणि कोमलता याचे एक अपूर्व मिश्रण असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव प्रकर्षाने पुढे येते.महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भूमिका बजावली तीच भूमिका माळवा प्रांतात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बजावली आहे.

      

स्त्रियांसाठी विपरीत परिस्थिती असताना बुद्धी चातुर्य व मनगटातील बळावर एका स्त्रीने आपल्या प्रजेच्या हितासाठी एक वेगळी वाट धरली होती. अहिल्याबाईचे कार्य आणि राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला.. रयतेला.. आपले वाटत होते, हेच ते ठळक वेगळेपण आहे.


 अहिल्याबाईचे बालपण : - 


अहिल्याबाईचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी ३१ मे १७२५ रोजी वडील माणकोजी शिंदे व आई सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला.वडील माणकोजी शिंदे गावचे पाटील होते.माणकोजी शिंदे यांनी अहिल्याबाईला लिहायला व वाचायला शिकवले.अहिल्याबाईंना शास्त्र विद्येबरोबरच शस्त्रविद्या व मूल्यवर्धित शिक्षणाचे धडे वडील माणकोजी व आई सुशीलाबाई यांच्या कडून मिळाले होते.


एके दिवशी मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवे पुण्याला जात असताना चौंडी येथे विश्रांतीसाठी थांबले.तहानलेल्या अवस्थेत दोघेही पाण्याचा शोध घेत असताना बाल अहिल्याशी त्यांची भेट झाली.त्यांनी अहिल्येला पाणी मागितले.अहिल्या म्हणाली " तहानलेल्यांना पाणी पाजण्या अगोदर दोन घास जेवू घालने हा आमचा धर्म आहे." बाल अहील्येच्या चेहऱ्यावरील तेज, शालीनता व तिचा धीटपणा मल्हारराव होळकरांना आकर्षित करून गेला.मनोमन त्यांनी ठरवले की आपला पुत्र खंडेराव सोबत अहिल्याबाईचे लग्न लावून तिला सून करून घ्यावे. लागलीच बोलणी करून व सर्व सोपस्कार पूर्ण करून अहिल्याबाईचा विवाह खंडेराव होळकर यांच्या सोबत २० मे १७३३ रोजी पुण्यात पार पडला.


मल्हाराव होळकरांनी इसवी सन १७२५ मध्ये आपल्या पराक्रमाची चुणूक दाखविल्यानंतर पेशव्यांनी पाचशे स्वारांची मनसब त्यांना बहाल केली. मल्हाररावांचे शौर्य, साहस , युद्धचातुर्य इतके श्रेष्ठ व अद्वितीय होते की,त्यांनी मराठ्यांच्या सेना गुजरात माळवा,राजपुताना ,बुंदेलखंड,प्रयाग,काशी,बंगाल, पूर्वेस कटक पासून ते वायव्येस अटक पर्यंत नेऊन पोहोचविल्या.उत्तर भारतात मराठी सत्ता वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे मल्हारराव होळकरांचा अद्वितीय पराक्रम होय.


सती प्रथेला नाकारून राज्य कारभार केला : - 


अहिल्याबाई यांचे राजकीय,धार्मिक गुरु हे सासरे मल्हारराव होळकर होते.त्यांनीच खऱ्या अर्थाने अहिल्याबाईंना राजकारण व धर्मकारण शिकविले. इ.स.१७५४ मध्ये पती खंडेराव होळकर यांना कुंभेरीच्या युद्धात वीरमरण आल्यामुळे त्यावेळच्या रीतीनुसार अहिल्या सती जायला तयार झाली. परंतु मल्हाररावांनी तिला सती जाण्यापासून रोखले. 


पुत्रशोकांनी व्याकूळ झालेल्या मल्हाररावांना सुनेची समजूत घालावी लागली. तरुण वयात वैधव्य पदरी आले असतानाही अहिल्याने आपल्या शोकाला आवर घालत सती न जात आपले संस्थान सांभाळणे हे कर्तव्य समजून कामाला लागली. एका दृष्टीने सती न जाता आपले कर्तव्य सिद्ध करण्यासाठी अहिल्याबाईंनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला.शूर , पराक्रमी,धाडसी,कर्तृत्ववान स्त्रियांनी पतीच्या मृत्यूनंतर सती न जाता पतीचे उर्वरित कार्य उत्तम प्रकारे करावे हे इष्ट आहे.


खंडेराव यांच्या सोबत काही सती गेलेल्या मुस्लिम स्त्रिया होत्या.तेव्हा त्या मुस्लिम बायकांची श्राद्धचे वेळी नावे घेऊन पाणी सोडण्यास भटजींनी नकार दिला.तेव्हा अहिल्याबाई तात्काळ कडाडल्या


" नाती काय धर्मानेच बांधतात का?  चराचरात ईश्वर पाहायला धर्म सांगतो. ज्या स्वामीमागे त्या जळून खाक झाल्यात त्यांचा नावे दोन पळ्या पाणी सोडणे जमत नसेल तर बंद करा तो श्राद्धविधी." अहिल्याबाईंनी अशा कळक शब्दात भटजींना सुनावले.कारण अहिल्याबाई प्रचंड पुरोगामी विचारांच्या पाईक होत्या.अनिष्ट रूढी परंपरांना त्यांनी कडाडून विरोध केला होता. 


पुत्र मालेराव यांच्या मृत्यूनंतर मालेरावांच्या पत्नी मैना व फिरता सती जाण्यासाठी निघाल्या तेव्हा अहिल्याबाईंनी त्या दोघींना सती जाण्यापासून परावृत्त करण्याचा आटोकाठ प्रयत्न केला. यावरून अहिल्याबाई किती पुरोगामी विचारांच्या होत्या ही बाब आपल्या लक्षात येते.


मल्हारराव सतत युद्धावर असतं. तसेच लढाया तर सारख्या होतच होत्या. १७६६ मध्ये झाशी जवळच्या अमलापुर गावी मल्हाररावांना वीर मरण प्राप्त झाले. इकडे अहिल्याबाईचा आधार तुटला सासरे मल्हाररावांच्या मृत्यूने त्यांच्या जीवनात एक प्रचंड पोकळी निर्माण झाली होती. आता अहिल्याबाईंना स्वतःच्या हिमतीवर होळकरांची दौलत सांभाळायची होती.अहिल्याबाई वर संकटांचे डोंगर कोसळत होते ३ जून १७६६ रोजी पुत्र मालेराव दौलतीचे वारस झाले.परंतू मल्हाररावांच्या मृत्यूनंतर अवघ्या वर्षाच्या आतच त्याचाही मृत्यू झाला.एकुलता एक मुलगा मरण पावला.  अशा बिकट प्रसंगी दुःखातून सावरत प्रजेसाठी विधायक कार्य करण्याचा त्यांनी संकल्प केला. 


अहिल्याबाईचे आपल्या प्रजेवर फार प्रेम होते. आपली प्रजा सुखात राहावी याची दक्षता त्या सतत घेत होत्या.सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतला होता.अतिशय स्वच्छ चारित्र्य,कर्तव्य कठोर तरीही प्रेमळ,प्रजाहितदक्ष अशी त्यांची तेजस्वी प्रतिमा होती.त्या स्वतः धनगर समाजातील होत्या तरी उच्चनीच्च भेदभाव त्यांनी कधी केला नाही. लोकांच्या हितासाठी त्यांच्या सुखासाठी राज्यकारभार करणारी ती राणी होती. दौलतीची मालकीण असूनही  तिचा उपभोग न घेणारी निस्वार्थी जनसेविका होती. त्यांनी केवळ आपल्या भागापुरता विचार केला नाही तर संपूर्ण भारत देशात त्यांची कीर्ती त्यांच्या कार्याचे रूपाने पसरली.


होळकरांची सून म्हणून अभिमान बाळगणाऱ्या अहिल्याबाई प्रजेवर नितांत अभिमान वाढवणाऱ्या प्रजेचे आणि राज्याचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे असे मानत.अतिशय सुसंस्कारी , वेळेचे भान असणारी, राजकारणात - समाजकारणात तरबेज असलेली स्त्री म्हणून इतिहासात त्यांच्या नावाची नोंद आहे. " पुण्यश्लोक "  म्हणून ख्यातनाम झाल्या.

       

         अहिल्याबाई समानतेचा पुरस्कार करणाऱ्या प्रागतिक विचारवंत होत्या. जातीभेद , धर्मभेद त्यांना मान्य नव्हते. जन्म कोणत्या जाती धर्मात झाला आहे यापेक्षा त्या व्यक्तीचे गुण कौशल्य कार्यकर्तुत्व त्यांना महत्त्वाचे वाटे. त्या काळात असा आधुनिक दृष्टिकोन असलेल्या अहिल्याबाई सर्वार्थाने श्रेष्ठच होत.


अहिल्याबाईंनी आपली सर्व धनदौलत प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले.नद्यांना सुंदर घाट बांधले, देवालय बांधले, अन्नछत्र सुरू केले, धर्मशाळा बांधल्या, पाण्यासाठी विहिरी तलाव असे जलाशय निर्माण केले. रस्ते बांधले, रस्त्याच्या दुतर्फ वृक्ष लागवड केली. त्यांची अशी कामे केवळ आपल्या राज्यापुरती मर्यादित नव्हती . देशात अनेक ठिकाणी मंदिरे, धर्मशाळा सुरू केले. म्हणून अहिल्याबाई त्या केवळ माळव्याच्या राहिल्या नाहीत. राणी अहिल्याबाई होळकर या देशाच्या सर्वांच्या आदरस्थानी राहिल्या. 


अहिल्याबाई धार्मिक वृत्तीच्या होत्या. सोमनाथ आणि काशी विश्वेश्वर मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. धार्मिक कार्य करत असतानाही सामाजिक कार्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही म्हणून त्यांची प्रजा सुखी होती.


अहिल्याबाई चा दरबार समृद्ध होता प्रवचनकार, कीर्तनकार, कलाकार, वैद्य, पंडित, विद्वान त्यांच्या दरबारात होते. त्याकाळी लोकांच्या मनातील धार्मिक भावना उत्कट होत्या.लोक तीर्थयात्रा करीत काशी, रामेश्वर, मथुरा, गया ,हरिद्वार ,ऋषिकेश, कांची, अयोध्या येथील यात्रेकरूंची अहिल्याबाईंनी व्यवस्था केली. माणसांचे तसेच जनावरांचे दवाखाने सुरू केले. वाहतुकीसाठी पक्के रस्ते बांधले. दुर्बलांचे पुनर्वसन त्यांनी केले.त्याकाळी समाजात अनाथ विधवा स्त्रियांवर खूप अन्याय होत असे त्यांनी अहिल्याबाईनी आधार दिला.


व्यक्तिगत दुःख पचवून प्रजाहितासाठी दक्ष असणारी अहिल्याबाई होळकर ही असामान्य धैर्यशील होती हे अनेक प्रसंगावरून दिसून येते. परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न राघोबादादांनी केला.अहिल्याबाईच्या सुभेदारीचा आणि दौलतीचा त्यांना लोभ सुटला. एकटी बाई माणूस काय करणार असे त्यांना वाटले. गंगाधरपंत आणि राघोबादादांनी कट कारस्थान रचले.अहिल्याबाईंचे राज्य गिळंकृत करण्याचा त्यांचा डाव होता. ही बातमी अहिल्याबाईना समजली.राघोबादादांच्या दृष्ट स्वभावाची त्यांना माहिती होतीच. त्या त्वेषाने उद्गारल्या " आमच्या पूर्वजांनी कुणाची खुशमष्करी करून हे राज्य मिळवले नाही. ते मिळविण्यासाठी रक्ताचे पाणी केले आहे. मी एक अबला, असहाय्य स्त्री आहे असे कोणी मानू नये. खांद्यावर भाले घेऊन मी उभी राहिले,तर सगळे मनसुबे जागच्या जागी विरून जातील.माझ्या राज्याकडे कोणी डोळा वर करून पाहण्याची हिंमत करू नये. आमचीही तलवार चालेल." अहिल्याबाई सामर्थ्यशाली होत्या, विरोधकांची चाल जाणून त्यास तोडीस तोड उत्तर देऊन राज्यकारभार करण्यात तरबेज होत्या.


अहिल्याबाई शिस्तप्रिय होत्या. प्रशासक म्हणून त्यांचा मोठा दरारा होता. त्यांच्या ठिकाणी असलेल्या अनेक गुणांमुळे त्यांना अनेक मानाच्या बिरुदावलीने गौरव झाला आहे. पुण्यश्लोक,लोकमाता ,दानशूर, धर्मपरायण, उत्कृष्ट प्रशासक असे त्यांना म्हटले जाते.


जीच्या व्यक्तिगत उत्पन्नातून वाहे दानाची सरिता !

ती गंगाजल निर्मल रानी कोण,जीचा नच कोश रीता !!


जगाच्या इतिहासात अनेक राणी , महाराणी, झाल्या पण काळाबरोबर विस्मृतीत गेल्या पण एका साधारण धनगर कुटुंबातील मुलीने समस्त मानव जातीला शौर्य,त्याग,मानवता,प्रेमाची शिकवण आपल्या लहान लोककल्याणकारी कार्यातून देऊन अखिल विश्वाला वंदनीय ठरली. ती फक्त एकच होती लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर . अहिल्याबाईच्या जीवनात  एका मागून एक दुःखांचे डोंगर कोसळत असताना सुध्दा त्यांनी आदर्श राज्य कारभार केला म्हणून खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता ठरल्या.


वयाच्या ७० व्या वर्षी १३ अगस्त १७९५ या दिवशी अहिल्याबाई पंचतत्वात विलीन झाल्या. मराठ्यांच्या दैदीप्यमान इतिहासात प्रखरतेने चमकलेली, अलौकिक कर्तुत्वाची लोकप्रिय राणी अहिल्याबाई होळकर तिच्या कार्यकर्तुत्वाचा आलेख मांडताना शब्द पुरे पडतात हे मात्र खरे आहे.


निश्चयाची महामेरू। सकल प्रजेची आधारू।

 अखंड कीर्तीची निर्धारु । राज योगिनी ।।


असे त्यांचे थोडक्यात वर्णन करावेसे वाटते.


आजच्या रयतेने अहिल्याबाई होळकरांचा खरा इतिहास शोधला पाहिजे.त्याचा योग्य अर्थ लावला पाहिजे. इतिहासात टाकाऊ असलेले टाकले पाहिजे. 


आजच्या काळात पुढे घेऊन जाणे योग्य हे असेल  तयात नव्या प्रगत विचारांची भर घालून योग्य रीतीने अभ्यासून पुढे नेले पाहिजे. अहिल्याबाईंच्या इतिहासात ,विचारात, व्यवहारात, कार्यात, प्रेरणेत आजही उपयुक्त ठरेल असे बरेच काही आहे. ते नीट समजून घेतले पाहिजे आणि पुढे नेले पाहिजे. अहिल्याईच्या २९९ व्या जयंती निमित्त हीच खरी मानवंदना ठरेल.


            संकलन व शब्दांकन 

 खेमदेव कन्नमवारऊर्जानगर,चंद्रपूर

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !