उन्हाच्या तडाख्यामुळे चंद्रपूर शहरात अघोषित संचारबंदी ; उष्माघाताने तरुणाचा मृत्यू.
एस.के.24 तास
चंद्रपूर : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे.तप्त उन्हामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. उन्हा तडाखा आता जिवघेणा ठरू लागला आहे. रविवारी सायंकाळी भद्रावती बस स्थानकासमोर राजू भरणे वय,39 वर्ष या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा,अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. आज चंद्रपूर शहराचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस,तर ब्रह्मपुरी ४५.० अशांवर पोहोचले. उन्हामुळे शहरात अघोषित संचारबंदी लागू असल्याचे दिसून येते. शहरातील रस्ते दुपारी निर्मनुष्य असतात. उन्हामुळे लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे.
भद्रावती बसस्थानकासमोर फिरत असताना राजू भरणे अचानक खाली कोसळले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. अतिमद्यप्राशनामुळे ते झोपले असावे, असे तेथून येणाऱ्या-जाणाऱ्यांना वाटले. मात्र, सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते उठले नाही. काहींनी जाऊन पाहिले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांना माहिती दिली.
उष्माघातामुळे होणारा त्रास : -
मनुष्याचे शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६.४ ते ३७.२ अंश सेल्सियस असते. बाहेर अथवा घरात तापमान अचानक वाढल्यास उष्णतेशी निगडित आजार होतात. त्यात शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे आणि उष्माघात असा त्रास होतो. उष्माघातामुळे हृदयविकारासह श्वसनविकार आणि मूत्रपिंडविकाराचा धोका निर्माण होतो.
विदर्भात ६९ रुग्णांची नोंद : -
विदर्भातील अकरा जिल्ह्यात १ मार्च २०२४ ते १४ मे २०२४ पर्यंतच्या कालावधीत उष्माघाताचे ६९ रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी सर्वाधिक २१ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यातील होते. नागपूर ग्रामीणमध्ये ११, गोंदिया ६, गडचिरोली ६, चंद्रपूर २, अकोला ५, अमरावती ३, भंडारा १, वर्धा ६, वाशीम १ व यवतमाळ जिल्ह्यात ७ रुग्ण नोंदवले गेले.