घरगुती वादातून पत्नीवर कुऱ्हाडी ने वार करून केली हत्या ; कोरची तालुक्यातील बेतकाठी गावातील घटना.

घरगुती वादातून पत्नीवर कुऱ्हाडी ने वार करून केली हत्या ; कोरची तालुक्यातील बेतकाठी गावातील घटना.


एस.के.24 तास


कोरची : घरगुती वादातून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील बेतकाठी गावात उघडकीस आली.हत्येनंतर निर्दयी पती रक्ताने माखलेली कुऱ्हाड हाती घेऊन गावभर फिरला.यामुळे गावात एकच खळबळ उडाली. 


अमरोतीन रोहिदास बंजार वय,33 वर्ष असे मृत महिलेचे नाव असून पती रोहिदास बिरसिंग बंजार वय,37 वर्ष याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.


बेतकाठी गावात राहणारे  जोडपे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते.घरगुती कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत असत. मंगळवारी रात्री   जेवण करून कुटुंब झोपी गेले. त्यानंतर पहाटे 3:00 वा. पती रोहिदास याने पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला.यात ती जागीच ठार झाली.


त्यानंतर रोहिदास हाती कुऱ्हाड घेऊन बाजार चौकात गेला.रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत पहाटे फिरणाऱ्या रोहिदासने संपूर्ण गावात दहशत निर्माण केली.काही वेळाने कुऱ्हाड पाण्याने धुवून घरामागे झुडुपात फेकून दिली.मोठ्या भावाने गावातील युवकांच्या मदतीने त्यास पकडून घरी खुर्चीत बसवले व खांबाला दोरीने बांधून ठेवले व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.


अमरोतीन व रोहिदास यांना चार मुली आहेत.रोहिदासने पत्नीचा खून केला तेव्हा घरात त्यांच्या मुली झोपलेल्या होत्या.पहाटे आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्थितीत आढळल्यानंतर आठ वर्षांची सर्वांत लहान मुलगी वैशाली ही हमसून हमसून रडू लागली. तिच्या आवाजाने रोहिदासचा मोठा भाऊ नोहरसिंग हा धावत आला.


दरम्यान  कोरची पोलिसांनी रोहिदास बंजार यास ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. मात्र, अद्याप खुनामागील कारण अस्पष्ट आहे.अधिक तपास सुरु असल्याचे कोरची ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !