लाखो रूपयांची मिरची पावसामुळे भिजली ; भिजलेल्या मिरची ला आता भाव मिळणे कठीण.
एस.के.24 तास
नागपूर : प्रखर उन्हासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरमध्ये यंदा उन्हाळ्यातच पावसाच्या धारा कोसळू लागल्या आहेत.गुरूवारी सकाळी जोरदार पावसाने संपूर्ण शहर न्हाऊन निघाले. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कळमणा बाजारपेठेतील शेतमाल या पावसाने भिजला.
त्यात शेकडो पोती धान्याची आणि सुकायला मोकळ्या जागेत टाकलेल्या लाल मिरचीचा समावेश आहे. कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डमधील लाल मिरचीची शेकडो पोती पावसामुळे भिजली.कळमना बाजारात येणाऱ्या मिरचीची मागणी देश विदेशात आहे.
मांढळ,राजुरा,चंद्रपूर, कागजनगर, आरमोरी, भिवापूर, वणी, वरोरा, बुलढाणा, चिखली, सिरोंचा, वरूड, मोर्शी, तारसा, मौदा येथून मिरचीची आवक होते.गुरूवारी सकाळी पावसामुळे उघड्यावर असलेली मिरची पोती तसेच खुल्या जागेवर टाकलेली लाखो रूपयांची मिरची पावसामुळे भिजली.
ही सर्व मिरची विक्रीसाठी बाजारात आली होती. भिजलेल्या मिरचीला आता भाव मिळने कठीण होणार आहे.पावसाचा जो इतका होता की तातडीने पोती सुरक्षित स्थळी हलवणे अवघड होते.
सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले, वादळामुळे झाडे पडली.वीज तारा तुटल्या. परिणामी अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. विशेष म्हणजे पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याऐवजी उकाडा निर्माण झाला.