चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोर झोनमध्ये एका वाघाला जिप्सी चालकांनी घेरले ; मोहर्ली ते खटोडा या रस्त्यावर ही घटना.
★ वाघ प्रकल्पातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले काय कारवाई होते सर्वांचे लक्ष वेधले आहे.
एस.के.24 तास
चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोर झोनमध्ये एका वाघाला जिप्सी चालकांनी घेरून ठेवल्याची घटना समोर आली आहे. वाघ बघण्याच्या स्पर्धेत असे प्रकार वारंवार होत असल्याने ताडोबा व्यवस्थापनाच्या काम करण्याच्या पद्धतीवर वन्यजीव प्रेमीं कडून टीका होत आहे.वाघाला जिप्सी चालकांनी घेरल्याची ही घटना शनिवारी उघडकीस आली.या घटनेने ताडोबा अंधारी वाघ प्रकल्पातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ताडोबाच्या कोअर झोनमध्ये जिप्सी स्वार पर्यटकांनी नियम धुडकावून वाघाला अशा प्रकारे घेरले की,वाघ त्रस्त झाला.वाघ आक्रमक झाला नाही अन्यथा ताडोबात मोठी घटना घडू शकली असती.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील मोहर्ली ते खटोडा या रस्त्यावर ही घटना घडली. ताडोबात नियम मोडण्याची ही आतापर्यंतची सर्वात भीषण घटना असल्याचे सांगण्यात आले.या घटनेमुळे ताडोबा व्यवस्थापन हादरले आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर आणि बफर झोनमध्ये पर्यटन सुरू आहे. यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार विस्तृत नियम व कायदे निश्चित करण्यात आले आहेत. मात्र संबंधित घटनेच्या या चित्रात जिप्सी चालक,गाईड आणि पर्यटकांनी मिळून येथे नियमांची पायमल्ली करून वाघा सोबतच आपला जीवही धोक्यात घातल्याचे स्पष्ट पणे दिसून येत आहे.
जिप्सीवर स्वार असलेल्या अनेक पर्यटकांमध्ये असहाय्य वाघ वाईटरित्या अडकल्याचे चित्रात स्पष्टपणे दिसत आहे. वाघाच्या देहबोलीवरून तो अस्वस्थ आणि घाबरलेला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ताडोबा कोअर झोनमधील मोहर्ली ते खटोडा रस्त्यावर ही घटना घडली.येथे जिप्सींना एकाच रांगेत चालण्याची परवानगी आहे.मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे.
दोषी जिप्सींची ओळख पटवण्यात मदत न मिळाल्यास आम्ही संपूर्ण पर्यटन स्थगित करू असेही डॉ.रामगावकर यांनी म्हटले आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही वन्यजीव अभ्यासक या प्रकरणाची तक्रार करणार आहेत. ताडोबात असा प्रकार वारंवार होत असल्याने अशा घटनांना जबाबदार जिप्सी चालक,गाईड तथा पर्यटक यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी वन्यजीव प्रेमी यांनी लावून धरली आहे. पर्यटक वाघ दिसला की जिप्सी चालकांना आग्रह करून असा प्रकार करण्यास भाग पाडत असल्याचेही अनेक घटनांतून समोर आले आहे.