येता अवकाळी - बळीराजाची पडली थंडी नाडी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१० /०५/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव, पिंपळगाव (भोसले) भालेश्वर , नांदगाव , सोंदरी, सुरबोडी ,चिखलगाव कुर्झा व परिसरातील कापणीच्या हंगामाला आलेल्या उन्हाळी धान पिकाला वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे जबरदस्त हादरा बसला आहे.
कापून झालेल्या धानाचे पुंजणे निसर्गाच्या अवकाळी पावसा पासून संरक्षण करण्यासाठी काही शेतक-यांनी पुजण्यावरती ताडपत्री झाकून ठेवली तर चुरता चुरता ओले झालेले धान वाळवून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न काही शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात कापणीला आलेले धान वादळ वारा व गारपिटीमुळे झोपून गेलेले आहेत.
एकीकडे निसर्ग आणि दुसरीकडे शासन बळीराजाच्या जीवनाचा अंत पाहत आहेत.शासनाने खरेदी केलेल्या पावसाळी धानाची शासकीय व वैयक्तिक गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या धानाची उचल न केल्यामुळे व्यापारी वर्ग हा विवंचनेत सापडला आहे.
तो बळीराजाचे उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी मोठा विचार करीत आहे. कारण त्यांना शासकीय यंत्रणे मार्फतअजून पर्यंत धान खरेदी करण्याची सूचना मिळालेली नाही.खरेदी केलेला माल हा कुठे ठेवायचा हा प्रश्न व्यापारी वर्गाला पडला आहे त्यामुळे शेतकरी सुद्धा हा कापणीला आलेला धान कापावा की नाही या दुहेरी मनस्थितीत आहे.धान कापला तर ठेवण्यासाठी जागा नाही आणि कापला नाही तर अवकाळी पाऊस मारतो.
शासनाने खरेदी करून साठवलेल्या पावसाळी धानाची शक्य तेवढ्या लवकर उचल करून उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी गोडाऊन उपलब्ध करून द्यावे अशी शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे म्हणणेआहे.