गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना चिखली येथील बोर तलाव खोलीकरण कार्याचा शुभारंभ. ★ महाराष्ट्र शासन,नाम फाउंडेशन,टाटा मोटर्सचा संयुक्त उपक्रम.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना चिखली येथील बोर तलाव खोलीकरण कार्याचा शुभारंभ.


★ महाराष्ट्र शासन,नाम फाउंडेशन,टाटा मोटर्सचा संयुक्त उपक्रम.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चिखली येथील बोर तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज गुरुवारी (ता. 30) जिल्हा जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी गिरीश कालकर, चिखलीचे ग्रामपंचायत सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लहू कडस्कर, उपसरपंच दुर्वास कडस्कर, गुरुभाऊ गुरूनुले प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका रायपुरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे यांच्या नेतृत्वात नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विविध तलावांचे खोलीकरणाचे कार्य प्रस्तावित आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या कामाचा शुभारंभ आज झाला.


चिखली येथील कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांनी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जेसीबी आणि जमिनीचे पूजन करून खोलीकरण कार्याचा शुभारंभ केला. शुभारंभ नंतर तलावातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना देण्यात आला. ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी हा गाळ शेतात टाकणार आहे. शासनाच्या या योजनेमुळे शेतीची गुणवत्ता वाढण्यासोबतच तलावाची पाणी साठवण क्षमता वाढेल. पर्यायी जमिनीमधील पाणी पातळीत वाढ होईल.


गाव विकासाच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया उपस्थित गावकऱ्यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, राजेश जोलमवार, पोलिस पाटील पूनम मडावी, ग्राम विकास अधिकारी प्रीती चिमुरकर, माजी उपसरपंच संजय गेडाम, सचिन बोर्डावार, प्रभाकर कडस्कर, राकेश कडस्कर तसेच गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.


काय आहे योजना ?


शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत शासनातर्फे तलावातील गाळ काढून देण्यात येतो. गावातील शेतकऱ्यांनी हा गाळ  आपल्या शेतात स्वतः वाहून न्यायचा आहे. हा गाळ शेतजमिनीवर टाकल्याने जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते. जमिनीचा पोत वाढतो ; तर दुसरीकडे तलावाचे खोलीकरण झाल्याने पाणी साठवण क्षमता वाढते. भूजल पातळीत वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना हा गाळ नेण्याचे आवाहन करण्यात येते जेणेकरून त्यांच्या शेतीची सुपिकता वाढल्याने त्यांच्या उत्त्पन्नात वाढ होऊन त्यांची आर्थिक स्थिति बळकट होईल.


Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !