पीक कर्जाचे वाटप केले नाही म्हणून,जिल्हा बँकेच्या कळंब येथील बँक निरीक्षकांच्या कॅबिनला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांना डांबले.

पीक कर्जाचे वाटप केले नाही म्हणून,जिल्हा बँकेच्या कळंब येथील बँक निरीक्षकांच्या कॅबिनला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांना डांबले. 


एस.के.24 तास


यवतमाळ : खरीप हंगाम जवळ आला तरी कळंब तालुक्यातील एकाही सेवा सोसायटीने पीक कर्जाचे वाटप केले नाही.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हा बँकेच्या कळंब येथील बँक निरीक्षकांच्या कक्षाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांना डांबले. या घटनेने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली.


संस्था तपासणीच्या नावाखाली बँकेचे निरीक्षक आणि सहकारी संस्था सचिवांमध्ये वसूलपात्र रकमेच्या वसुलीवरून वाद निर्माण झाला. मे महिना संपत आलेला असतानाही पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कक्षात कोंडून आपला संताप व्यक्त केला.


बँकेचे उपसरव्यवस्थापक प्रफुल्ल येंडे, बँक निरीक्षक गजानन कापनवार, नीरज भालकर, वसुली अधिकारी अभय कदम आदींना शेतकऱ्यांनी जाब विचारून कक्षात डांबले. खरेदी-विक्री संघाचे सभापती बालू पाटील दरणे, कळंब विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, प्रा. घनश्याम दरणे, सचिन शेंडे, राजूर संस्थेचे अध्यक्ष रामदास गाडेकर, कोठा संस्थेचे अध्यक्ष देविदास शेटे, संचालक ज्ञानेश्वर ठाकरे, राजू नरवडे, नामदेव पोतदार, संजय दरणे, राहुल कदम, अमोल धोटे यांनी कक्षाला कुलूप ठोकले.


या घटनेची माहिती मिळताच मुंबई बाजार समितीचे संचालक तथा कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, बँकेचे संचालक बाबू पाटील वानखेडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे तातडीने कळंब बँकेच्या शाखेत पोहोचले.त्यांनी सोसायटीचे सचिव, बँक कर्मचारी आणि कुलूप ठोकणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेतली व आज, मंगळवारपासून कर्ज वाटप करण्याची ग्वाही दिली.


जिल्ह्यात बँकांचे कर्ज वाटप अद्यापही रखडलेले आहे. आतापर्यंत केवळ आठ टक्के कर्ज वाटप झाले आहे. मे महिना संपत आला तरी ९२ टक्के कर्ज वाटप व्हायचे आहे. बँकांचे कर्ज वितरण केवळ एक ते तीन टक्क्यांपर्यत मर्यादित आहे. यात बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँंक आणि यूबीआय बँकेचा समावेश आहै. या बँकांनी अद्याप तीन टक्क्यांपर्यंतच कर्ज वितरण केले आहे.


या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १८ बँका दोन लाख ३१ हजार शेतकऱ्यांना दोन हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करणार आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक ८५ हजार शेतकऱ्यांना ६७९ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करणार आहे. या बँकेने आतापर्यंत ७ हजार ३६६ शेतकऱ्यांना ७७ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने सहा हजार ३६६ शेतकऱ्यांना ८५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.


 इतर बँकांच्या तुलनेत या बँकेचे कर्ज वाटप सर्वाधिक आहे. एकूण उद्दिष्टाच्या ५२ टक्के कर्जाचे वितरण बँकेने पूर्ण केले आहे. ११ राष्ट्रीयीकृत बँंकांनी सात हजार ८१७ शेतकऱ्यांना ९९ कोटी ७५ लाख रुपये कर्ज वितरीत केले आहे. 


पीक कर्ज वाटपाची गती न वाढविल्यास जून महिन्यात बँकांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !