सम्राट अशोकाचे कार्य मानव समाजासाठी दीपस्तंभा सारखे. - प्रा.डॉ.मोहन कापगते.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : १२/०४/२०२४ सम्राट अशोक यांनी निर्माण केलेले शिलालेख म्हणजे त्याचे कोरीव आत्मचरित्र होते. आपला मानवी कल्याणाचा विचार त्यांनी शेकडो शिलालेखात कोरून ठेवला. बुद्ध धर्माला त्यांनी विश्वधर्म बनविला. भारताला त्यामुळे जगात ओळखले जाऊ लागले. म्हणूनच त्याचे कार्य मानव समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे विचार प्रोफेसर डॉ. मोहन कापगते इतिहास विभाग प्रमुख ने.हि.महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यही त्यांनी अधोरेखित केले. ते ब्रह्मपुरी येथील बुद्ध विहार गौतम नगर सेवा समिती तर्फे आयोजित महात्मा फुले, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती समारोहात मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.या वेळी विचार पीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष नेताजी मेश्राम माजी सभापती पंचायत समिती,ब्रम्हपुरी हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून संदीप मेश्राम व रवी चहांदे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात नेताजी मेश्राम यांनी समाजाला जागृत करण्यासाठी महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून समाजाचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे सांगितले.यावेळी प्रमुख अतिथीनी आपले मनोगत व्यक्त केले.दीप प्रजवलन व महापुरुषांना माल्यार्पण करून आणि अशोक स्तंभाला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेश रामटेके यांनी केले. कार्यक्रमाला बौद्ध विहार समितीचे सर्व सदस्य व अशोक चौकातील व गौतम नगरातील नागरिक बहुसंख्यने उपस्थित होते.