भामरागड तालुक्यातील रानटी हत्तीने शेतकऱ्याला पाया खाली चिरडले.
एस.के.24 तास
गडचिरोली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात ठाण मांडून असलेल्या रानटी हत्तींचा उपद्रव पुन्हा सुरु झाला आहे. तेलंगणात दोन शेतकऱ्यांचे बळी घेऊन परतलेल्या रानटी हत्तीने २५ एप्रिलला दुपारी चार वाजता भामरागडच्या कियर जंगलात एका शेतकऱ्यांस पायाखाली चिरडले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
गोंगलू रामा तेलामी वय,४६ वर्ष रा.कियर ता.भामरागड जिल्हा, गडचिरोली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्राणहिता नदी ओलांडून रानटी हत्तीने तेलंगणात प्रवेश केला होता. सीमावर्ती भागात धुडगूस घालत या हत्तीने दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला होता. त्यानंतर तो पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत परतला होता. या हत्तीने बल्लाळम येथील घनदाट जंगलात ठाण मांडल्यानंतर २४ एप्रिल रोजी रात्रीपासून आपला मोर्चा कियर जंगलाकडे वळवला.
दरम्यान, वनविभागाला माहिती मिळताच त्यांची एक चमू त्याठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असताना गोंगलू तेलामी यांनी मागच्या बाजूने हत्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी रानटी हत्तीने त्यांना सोंडेने उचलून जमिनीवर आदळले व त्यानंतर पायाखाली चिरडले. यात त्यांचे शरीर छिनविछिन्न झाले. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांचीही मोठी गर्दी झाली आहे. हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
कळपातून भरकटल्यानंतर हा हत्ती दक्षिण गडचिरोलीतील जंगलात भटकतो आहे. काही ठिकाणी पिकांचीही नासधूस केली. तेलंगणात दोघांचा बळी घेतला. आता भामरागड परिसरात त्याने एकाच बळी घेतला आहे. वनविभागाची चमू या हत्तीवर नजर ठेऊन आहे. नागरिकांना वारंवार सूचना देऊनही ते हत्तीजवळ जाण्याचा किंवा त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. असे करणे धोकादायक असून कुणीही हत्तीजवळ जाऊ नये. - शैलेश मीना, उपवनसंरक्षक भामरागड वनविभाग