सगनापुर ते चांदेश्वर पुलावरील खड्डे अजूनही जैसे थे,खासदार व आमदार यांची बघ्याची भूमिका. ★ जनतेला करावा लागतोय जीवघेणा प्रवास पावसाळ्यात चिखलाचा मारा.

सगनापुर ते चांदेश्वर पुलावरील खड्डे अजूनही जैसे थे,खासदार व आमदार यांची बघ्याची भूमिका.


जनतेला करावा लागतोय जीवघेणा प्रवास पावसाळ्यात चिखलाचा मारा.


एस.के.24 तास


चामोर्शी : तालुक्यातील स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या सगणापूर-चांदेश्वर रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्यासाठी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात दुरुस्ती करण्यात आली.मात्र ही दुरुस्ती थातूरमातूर करून नवीन पुलाची निर्मिती व रस्त्यावरील अनेक खड्डे कायम ठेवल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाची थातूरमातूर दुरुस्ती करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संबंधित कंत्राटदाराला अभय तर देत नाही ना ? असा सवाल परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.


चामोर्शी तालुक्यातील सगणापूर-चांदेश्वर येणापूर या दरम्यान जोडणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग चामोर्शी अंतर्गत येतो. या मार्गाने शाळकरी विद्यार्थी व शेतकरी बांधव येणापूर तसेच शेतात जात असतात.त्यामुळे या मार्गावर अल्पावधीतच ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या डागडुजीचे काम चामोर्शी येथील एका कंत्राटदाराने केले आहे. परंतु नवीन पुलाची निर्मिती कधी व केव्हा होणार ? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. सगणापूर-चांदेश्वर या मार्गाची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली.अर्धवट दुरुस्ती काय कामाची ? आता लहान खड्डेही विस्तारत आहेत.रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहणार नाही. 


हा धोका टाळण्यासाठी रस्त्यावरील लहान-मोठे सर्वच खड्डे बुजविणे गरजेचे होते.परंतु थातूरमातूर काम केल्याने लहान खड्डे कायम आहेत.रस्त्याची दुरुस्ती करूनही काही उपयोग झाला नाही. अर्धवट दुरुस्ती काय कामाची ? असा सवाल करीत या कामाची चौकशी करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते,प्रमोद झरकर,अशोक खंडारे, प्रवीण तिमाडे व नागरिकांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !