प्रतिभाताई खासदार होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. - विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते
★ विकास पुरुषाने चंद्रपूरचा काय विकास केला. - वडेट्टीवार यांचा सवाल.
★ देशांतील लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी ही ऐतिहासिक लढाई. - बाळासाहेब थोरात
एस.के.24 तास
मुल : देशात मोदी लाट असताना बाळू धानोरकर यांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणले होते. आता लाट नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर प्रतिभाताई खासदार होत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, सा संकल्प करत विकास पुरुषाने चंद्रपूरचा काय विकास केला, असा सवाल श्री.वडेट्टीवार यांनी विरोधकांना केला.
मूल इथे इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात याची प्रचारसभा झाली.या प्रचार सभेत दोन्ही नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
श्री.वडेट्टीवार म्हणाले कि,भाजप विरोधात लाट आहे. त्यामुळे भाजपवाले मुळासकट उखडून पडतील. फक्त एक धक्का द्या आणि मोदी मुक्त भारत करा. हे जुमलेबाज सरकार आहे. या सरकारचे मुखिया सकाळीं उठल्यापासून खोटं बोलायला सुरुवात करतात. मणिपूरमध्ये महिला शोषण झाले. महिलांची अब्रू लुटली. नग्न करून महिलांची धिंड काढली. तेव्हा देशाचे पंतप्रधान कुठे होते? आदिवासी महिलांचे शोषण होत असताना पंतप्रधानांना झोप कशी लागते ? असा सवाल देखील श्री.वडेट्टीवार यांनी केला.
दोन मुख्यमंत्री तुरुंगात गेले. काल राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर चेक केले. मग भाजपच्या नेत्यांची तपासणी का होत नाही, असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात गेले,काल परवा माझ्याबद्दल पण अफवा पसरवली. पण लक्षात ठेवा बाबासाहेब म्हणाले होते १०० दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जागा. मी वाघ आहे असे श्री. वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले.
केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून आमदार फोडले. उद्या सत्ता बदलली तर सुरुवात चंद्रपूर पासून होईल. आम्हाला कसला धाक दाखवताय. अनेकदा ऑफर येतात पण मी भीक घालत नाही. किती महिने आत ठेवलं तरी मी मी घाबरत नाही. आम्ही प्रतिभाताई धानोरकार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी प्रतिभाताई यांना तुम्ही निवडून द्या, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले : -
प्रत्येक घरात भांड्याला भांड लागते. पण घरावर वेळ येते तेव्हा कुटुंब एकत्र येत असत. संकट बाहेरून येत तेव्हा कुटुंबाला एकत्र येऊन लढायचे असते त्यामुळे विजय वडेट्टीवार आणि त्यांची टीम काम करते हे महत्वाचे आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.सगळं विसरून ते प्रतिभाताईंना निवडून आणण्यासाठी कामाला लागले आहेत. दिवंगत खासदार बाळू धानोरकर काम करणारा माणूस,पण अकाली त्यांचे निधन झाले, प्रतिभा धानोरकर यांच्यावर आकाश कोसळले तरी ताई लढायला उभ्या राहिल्या, ताईचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.प्रतिभा धानोरकर आदर्श खासदार म्हणून काम करतील. ताईंना प्रचंड मतांनी निवडून द्या,असं आवाहन विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.
सभेत मंचावर राज्याचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात,काँग्रेसचे सचिव आशीष दुआ,जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे,जिल्हा प्रभारी पठाण,रा.काँ.जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) राजेंद्र वैद्य, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष,संतोष सिंह रावत,माजी आ. देवराव भांडेकर,प्रकाश पाटील मारकवार, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर,डॉ.विश्वास झाडे, राजू झोडे, राकेश रत्नावार,घनश्याम येनुरकर,व महाविकास आघाडीचे व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.