पूर्व विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी (१९ एप्रिल 2024) ला मतदान होणार.
★ सर्व ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी,अशी थेट लढत आहे.
एस.के.24 तास
नागपूर : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी (१९ एप्रिल) मतदान होत आहे. सर्व ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी थेट लढत आहे.
पूर्व विदर्भात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघांचा समावेश होतो. २०१९ च्या निवडणुकीत पाचपैकी चार जागा भाजप-सेना युतीने तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात आहेत.
चंद्रपूर-वणी-आर्णी
भाजपसाठी नागपूरनंतर हा महत्त्वाचे मतदारसंघ. राज्याचे वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीने या मतदारसंघातील दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. मुनगंटीवार विकासाच्या मुद्दय़ावर ही निवडणूक लढत असून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांचा मतदारसंघातील जातीय समीकरणावर भर आहे. वंचितचे राजेश बेले रिंगणात आहे. मुनगंटीवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली.
गडचिरोली-चिमूर
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात महायुतीचे खासदार अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडीचे नामदेव किरसान यांच्यात थेट लढत आहे. नेते तिसऱ्यांदा निवडणूक लढत असून किरसान हा नवा चेहरा आहे. काँग्रसने दिलेल्या उमेदवारा विरुद्ध नाराजी व्यक्त करीत पक्षाचे नेते नामदेव उसेंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी दावा केला होता. त्यामुळे भाजपला उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला. प्रचारा दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला होता.
भंडारा-गोंदिया
भंडारा-गोंदिया मतदारसंघांत भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे महायुतीचे तर काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मेंढे विरुद्ध पडोळे लढतीत बहुजन समाज पक्षाचे संजय कुंभलकर व काँग्रेसचे बंडखोर सेवक वाघाये यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. महायुतीतर्फे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तर काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
नागपूर मतदारसंघ
नागपूरमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्याशी आहे. मतदारसंघात केलेला विकास हा गडकरींचा प्रचाराचा मुद्दा आहे तर विकास ठाकरे यांनी विकासाचा फायदा नागपूरला काय? असा सवाल केला आहे. वंचितने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. बसपाचे योगेश लांजेवार रिणांगणात आहे. असे असले तरी गडकरी विरुद्ध ठाकरे, अशीच लढत आहे. संघाचे मख्यालय असलेली नागपूरची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे.
रामटेक
नागपूर जिल्ह्यातील दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे रामटेक. येथे शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे शामकुमार बर्वे यांच्यात थेट लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या मतदारसंघात सभा झाली. पारवे काँग्रेसचे आमदार होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी सेनेत प्रवेश केला. त्यामुळे सेनेत नाराजी आहे. काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र रद्द होण्याचा मुद्दा प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. बसपाचे संदीप मेश्राम रिंगणात आहे.