गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; ढिसाळ आरोग्य व्यवस्था पुन्हा चर्चेत. ★ कुटुंबीयांनी मुलीला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेले,पण तिथे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी गैरहजर होते.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; ढिसाळ आरोग्य व्यवस्था पुन्हा चर्चेत.


★ कुटुंबीयांनी मुलीला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेले,पण तिथे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी गैरहजर होते.


एस.के.24 तास


एटापल्ली : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेद्रांची निर्मिती करण्यात आली.परंतु या केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने येथील आदिवासींना उपचारासाठी वणवण भटकावे लागते.असाच दुर्दैवी प्रसंग एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावातील चार वर्षीय अत्याचार पिडीत बालिकेच्या पालकांवर ओढवला. अखेर त्या चिमुकलीला उपचारासाठी नागपूरला न्यावे लागले.


यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आरोग्य उपकेंद्राला टाळे ठोकून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना डांबले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा टीकेच्या केंद्रस्थानी असून आदिवासींची हेळसांड केव्हा थांबणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


९ मार्च रोजी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी आरोग्य पथकात शिपाई पदावर कार्यरत संतोष नागोबा कोंडेकर वय,५२, रा.भेंडाळा ता.चामोर्शी जिल्हा,गडचिरोली याने घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर घरी बोलावून अत्याचार केला. प्रकरणाची वाच्छता झाल्यानंतर पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेले, पण तिथे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे उपचारासाठी मुलीला घेऊन ते रात्री जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पोहोचले. मुलीला १० मार्चला सकाळी अधिक उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. 


पीडितेच्या आईच्या जबाबावरून गडचिरोली ठाण्यात बलात्कार,बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला अटक देखील करण्यात आली. मात्र, गावात प्राथमिक आरोग्य पथक असताना पीडितेला उपचारासाठी वणवण भटकावे लागल्याने गावकऱ्यांनी आरोग्य विभागावर रोष व्यक्त केला.


सोमवारी आरोग्य पथकाच्या इमारतीला टाळे ठोकण्यात आले.कर्तव्यावर सतत गैरहजर राहणारे जारावंडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लोकेशकुमार कोटवार व कर्मचाऱ्यांवर गावकऱ्यांचा रोष होता.मंगळवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,आयुषी सिंह यांनी जारावंडीला भेट देऊन गावकऱ्यांना कारवाईचे आश्वासन दिले.


गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार : - 

या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी दुर्गम जारावंडीला भेट देऊन टाळे उघडले.यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. सोबतच त्यांनी आरोग्य पथकातील तीन कंत्राटी डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी डॉ.कोटवार यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.


मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी दुर्गम भागातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी कडक पावले उचलण्याचे संकेत दिले असून प्रतीनियुक्तीचा घोळ लवकरच संपुष्टात आणणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !