२८ लाखांचा मद्यसाठा जप्त; निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मोठी कारवाई.
एस.के.24 तास
चामोर्शी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोली पोलिसांनी अवैध मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा उगारला असून चामोर्शी तालुक्यातील जंगमपूर जंगल परिसरातून तब्बल २८ लाखांचा मद्यसाठा जप्त केला. कारवाईची कुणकुण लागताच तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध विक्री सुरूच असते. यामुळे अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.जिल्ह्यात सद्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध दारूविक्री विरूद्ध कडक पावले उचलली आहे.
दरम्यान, चामोर्शी तालुक्यातील जंगमपुर जंगल परिसरात मोठ्यात प्रमाणात मोहफुलापासून दारू निर्मिती करण्यात येत होती.यासंदर्भात गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून कारवाई केली. यावेळी दारूविक्री करणाऱ्या जुगल लखन दास,देवदास किसन मंडल, सुब्रातो विश्वास व इतर रा.नेताजी नगर या तिघांनी तेथून पळ काढला.
चामोर्शी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुल्लरवार, उपनिरीक्षक राधिका शिंदे यांच्या पथकाने परिसराची झडती घेतली असता दारू काढण्यासाठी साठवून ठेवलेला तब्बल २८ हजार लिटर मोहसडवा आढळून आला. बाजारभावनुसार या मालाची किंमत २८ लाख इतकी आहे. मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री वाढली होती.
या कारवाईमुळे दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे. समोर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्रीची शक्यता लक्षात घेता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार पोलिसांनी ठिकठिकाणी याविरोधात मोहीम सुरू केली आहे.