सिद्धार्थ बुद्धविहार येथे जयंती वनकर यांच्या " पेटत राहा ठिणगी बनून " या काव्यसंग्रहाचे प्रकाशन.
★ काव्यसंग्रहात माणूस म्हणून जगण्याला प्राधान्य देत मानवतेचा उद्घोष करणारा विचार. - डॉ.भडके
एस.के.24 तास
चंद्रपूर : झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेद्वारा आयोजित कवयित्री जयंती वनकर यांच्या ' पेटत राहा ठिणगी बनून ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तुकूम येथील समता सिद्धार्थ बुद्धविहारात संपन्न झाले .
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.कार्यक्रमाचे उद्घाटन अ.भा. रा.स.पेन्शनर्स फेडरेशनचे शालिक माऊलीकर यांच्या हस्ते झाले.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. इसादास भडके, झाडीबोलीचे जिल्हाध्यक्ष कवी अरुण झगडकर, गझलकार दिलीप पाटील,सामाजिक कार्यकर्ते डॉ. जे.बी. रामटेके, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत पि.व्ही.मेश्राम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी डॉ.भडके म्हणाले की, या काव्यसंग्रहाच्या प्रेरणास्थानी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार असून येथील रचना मानवतेचं संवर्धन करणाऱ्या आहेत.
बंडोपंत बोढेकर म्हणाले की, या काव्यसंग्रहातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम दर्शन घडून येत असून कवयित्रीनी बदलत जाणा-या समाज जीवनाची शाश्वत भाषा शब्दबध्द केल्याचे मत व्यक्त केले.कवयित्रींनी आपल्या अंतर्मनातील विचार निराशेच्या गर्तेत सापडू न देता सकारात्मक कृती विचार मांडलेला आहे,असे मत कवी अरूण झगडकर यांनी मांडले.
गझलकार दिलीप पाटील,डॉ.रामटेके यांनीही या काव्यसंग्रहाचे अनुषंगाने समयोचित विचार व्यक्त करून कवयित्रीच्या लेखन कार्यास शुभेच्छा दिल्यात.प्रास्ताविक कवयित्री जयंती वनकर यांनी केले. या कार्यक्रमात लाडूबाई सोमाजी रायपुरे, लिनता कृष्णाजी जुनघरे (भद्रावती)आणि सुधाबाई खोब्रागडे (गडबोरी) या तिन्ही ज्येष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन कवयित्री सीमा भसारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कवयित्री शितल कर्णेवार यांनी केले.दुस-या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन झाले. कवयित्री अर्जुमन शेख यांच्या अध्यक्षतेत तर कवी पंडित लोंढे, प्रशांत भंडारे, संतोष मेश्राम आदींच्या उपस्थितीत तब्बल २५ कवींनी स्वरचित रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कवी संमेलनाचे सूत्रसंचालन आरती रोडे यांनी केले.