काँग्रेसने दोन दिवसांत उमेदवारी जाहीर करावी ; अन्यथा तेली समाज आक्रमक. ★ मुनगंटीवार यांनी ही तेली समाजाला गृहीत धरू नये. - समाजाचे नेते तथा शिवसैनिक अजय वैरागडे

काँग्रेसने दोन दिवसांत उमेदवारी जाहीर करावी ; अन्यथा तेली समाज आक्रमक.


★ मुनगंटीवार यांनी ही तेली समाजाला गृहीत धरू नये. - समाजाचे नेते तथा शिवसैनिक अजय वैरागडे


एस.के.24 तास


चंद्रपूर : लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच तेली समाज आक्रमक झाला आहे. पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा - गोंदिया अथवा चंद्रपूर - वणी - आर्णी या तीनपैकी एका लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने तेली समाजाचा उमेदवार द्यावा, अन्यथा लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेऊ, असा इशारा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पत्रपरिषदेत दिला. तेली समाजबांधवांची बैठक मंत्रा सेलिब्रेशन सभागृहात रविवारी दुपारी एक वाजता झाली.


 या बैठकीला देवतळे यांच्यासह तेली समाजाचे नेते तथा माजी आमदार देवराव भांडेकर, विनायक बांगडे, विदर्भ तेली महासंघाचे नंदू खनके, भाजयुमोचे पदाधिकारी आशीष देवतळे, माजी नगरसेविका छबू वैरागडे, विना खनके, महिला काँग्रेस अध्यक्ष वैरागडे, बबनराव फंड, अजय वैरागडे, नीलेश बेलखेडे, आकाश साखरकर यांच्यासह तेली समाजात सक्रिय विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत देवतळे यांनी भाजपने वर्धा लोकसभा मतदारसंघातून तेली समाजाचे प्रतिनिधी खासदार रामदास तडस यांना पुन्हा संधी दिली, त्याबद्दल भाजपचे आभार मानले. आता काँग्रेसनेही पूर्व विदर्भातील एका लोकसभा मतदारसंघातून तेली समाजाचा उमेदवार द्यावा, अशी आमची मागणी आहे. विदर्भात तेली समाजाचे मतदार लाखोंच्या संख्येत आहेत. ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ या तत्त्वावर काँग्रेसने किमान एक जागा द्यावी, त्यातही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी, अशी मागणी समाजाने केल्याचे देवतळे यांनी सांगितले.


जिल्हा काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे व प्रकाश देवतळे या दोघांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र, प्रदेश काँग्रेसने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांची नावे पाठवली आहेत. या तिघांशिवाय अन्यांचा विचार व्हावा व उमेदवारी तेली समाजाच्या बांगडे अथवा देवतळे यांना द्यावी,अशीही मागणी तेली समाजाने केली. दोन दिवसात काँग्रेसने निर्णय घ्यावा अन्यथा तेली समाज वेगळी भूमिका घेईल,असा इशारा देवतळे यांनी दिला.


मुनगंटीवार यांनी ही तेली समाजाला गृहीत धरू नये. - समाजाचे नेते तथा शिवसैनिक अजय वैरागडे

भाजपने तेली समाजाला कधीच महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी दिली नाही, असा आरोप समाजाचे नेते तथा शिवसैनिक अजय वैरागडे यांनी केला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महापालिकेत स्वत:च्या समाजाच्या राखी कंचर्लावार यांना सलग दोन वेळा महापौर केले. यावेळी संधी असतानाही तेली समाजाच्या अनुराधा हजारे, छबू वैरागडे यांना महापौर केले नाही. मुनगंटीवार यांच्यामुळेच तेली समाजाला संधी मिळाली नाही. तेव्हा मुनगंटीवार यांनीही तेली समाजाला गृहीत धरू नये, असा इशारा वैरागडे यांनी दिला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !