ग्राहकांनी जागरूक असणे आवश्यक. - प्रा.अवसरे
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : आजचा विद्यार्थी हा उद्याचा ग्राहक असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्राहकांच्या हक्क आणि अधिकाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची केली जाणारी फसवणूक रोखण्यासाठी प्रत्येक ग्राहकाने व्यवहारिक जीवनात जागरूक असणे आवश्यक असल्याचे मत अध्यक्षिय भाषणातून प्रा. अवसरे यांनी व्यक्त केले. ते स्थानिक राजीव गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित जागतिक ग्राहक दिन या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शिवणकर यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी प्रा. बेहरे, प्रा. कामडी यांची विचार मंचावर उपस्थिती होती. प्रा. कामडी यांनी ग्राहकांना आपल्यावर झालेल्या अन्यायप्रती ग्राहक न्यायालयात दाद मागता येते त्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून ग्राहकांचे हक्क आणि अधिकार जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून"ग्राहक संरक्षण कायदा व आजचा ग्राहक"या विषयावर महाविद्यालयात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोनाली राऊत यांनी केले तर आभार प्रा. सय्यद यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.