डॉ.रूपेश कऱ्हाडे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन नागपूर येथे थाटात संपन्न.
★ विषमता निर्माण करणारे लोकं नैतिक असू शकत नाही. - डॉ.यशवंत मनोहर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : २०/०३/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथील मुळचे रहिवासी असलेले आणि सध्या दिग्रस येथील बा.बु.कला, ना.भ.वाणिज्य व बा.पा. विज्ञान महाविद्यालया- तील मराठी भाषा व साहित्य विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ.रूपेश नरहरी कऱ्हाडे यांनी संपादित केलेल्या 'साहित्यसमीक्षा आणि समजचिंतन ' या डॉ.प्रकाश खरात गौरव समीक्षा ग्रंथाचा प्रकाशन समारंभ 'अर्पण सभागृह' दुसरा माळा, मोर भवन, हिंदी साहित्य संमेलन, झांशी राणी चौक, नागपूर येथे नुकताच अत्यंत दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला.
' साहित्य समीक्षा आणि समाजचिंतन ' या गौरव समीक्षा ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष म्हणून ख्यातनाम आंबेडकरवादी साहित्यिक व विचारवंत, गुरूवर्य डॉ. यशवंत मनोहर सर हे उपस्थित होते तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शैलेंद्र लेंडे मराठी विभाग प्रमुख रा.तु. म.नागपूर विद्यापीठ, नागपूर तसेच आयु. भूपेंद्र गणवीर माजी संपादक 'दैनिक सकाळ' आवृत्ती नागपूर हे या ग्रंथावर आपले विस्तृत समीक्षात्मक विचार व्यक्त केले.
या एकूण ५५२ (५२० +३२ रंगीत पृष्ठ)पृष्ठांच्या गौरव समीक्षा ग्रंथात महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठा तील नामवंत साहित्यिकांनी लिहिलेले अत्यंत मार्मिक व दर्जेदार एकूण ५१ लेख तसेच डॉ. रूपेश कऱ्हाडे यांनी डॉ.खरात सरांची घेतलेली एक महत्त्वपूर्ण दीर्घ मुलाखत आहे.म्हणजेच ५२ दर्जेदार लेख येथे समाविष्ट आहेत. या मुलाखतीतून १९६० नंतरच्या आंबेडकरवादी साहित्यावर प्रखरपणे प्रकाश टाकलेला आहे. सदर ग्रंथ मराठी विषयाच्या पीएच.डी. साठी संशोधन करणाऱ्या संशोधकांना प्रचंड उपयुक्त ठरणार आहे.
" विषमतेची तरफदारी करणारे शब्द साहित्य ठरू शकत नाही.जात,वर्ण, वर्गातून बाहेर पडल्याशिवाय माणूस होता येणार नाही. आणि माणूस झाल्याशिवाय साहित्य निर्माण करता येणार नाही."* असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
डॉ.प्रकाश खरात यांच्या ' साहित्यसमीक्षा आणि समाजचिंतन ' या गौरव समीक्षा ग्रंथाचं कौशल्यपूर्ण संपादन डॉ. रूपेश नरहरी कऱ्हाडे, दिग्रस यांनी केले. या प्रकाशनप्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ.यशवंत मनोहर बोलत होते.पुढे ते म्हणाले की, "साहित्याची जुनी भूमिका जसजशी स्पष्ट होत गेली. तसतसे मानसिक विभाजन होत गेले. अवैज्ञानिक विचार हा अनैतिक असतो. विज्ञाननिष्ठतेवरच नैतिकता उभी राहू शकते....विषमता निर्माण करणारे लोकं नैतिक असू शकत नाही....आंबेडकरवाद हा जगातील सर्व उजेडांना कवटाळणारा प्रबंध आहे.
" राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी डॉ. प्रकाश खरात यांच्या कथा, समीक्षा, आणि वैचारिक वाड्.मयावर समर्पक आणि मार्मिक भाष्य केले. डॉ.लेंडे म्हणाले ,"डॉ प्रकाश खरात यांनी कथेच्या माध्यमातून बौद्ध संस्कृतीचा वारसा जपला आणि स्पष्ट केला आहे. आंबेडकरवादाचे प्रारूप समीक्षा ग्रंथांतून मांडले आणि आंबेडकरी परिप्रेक्ष्यामध्ये समाजाच्या अंतरंगाचे चिंतन डॉ. खरातांनी आपल्या साहित्यातून उलगडून दाखवले आहे. आंबेडकरवादी लेखकांसाठी आजचा कालखंड हा जळत्या घराचा आहे.
डॉ.प्रकाश खरात यांचे साहित्य येणाऱ्या पिढ्यांना योग्य दिशा दिग्दर्शन करणारे दीपस्तंभ ठरणारे आहे ." ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र गणवीर म्हणाले की," धर्मवादाला खतपाणी घालणारे नायक प्रतिगाम्यांनी उभे केले.परंतू प्रतिगाम्यांचा बुरूज ढासळून टाकण्याची क्षमता प्रकाश खरातांच्या साहित्यात आहे. डॉ.प्रकाश खरात यांनी 'युवास्पंदन' नावानं चांगले स्तंभलेखन केले आहे.आज मात्र लेखनकलेपासून येथील व्यवस्था बहुजनांना दूर ठेवत आहे." असेही भूपेंद्र गणवीर म्हणाले.
डॉ.रूपेश नरहरी क-हाडे यांनी गौरव समीक्षा ग्रंथाच्या संपादना मागील जडणघडण मांडली. "गौरवग्रंथाचे संपादन करणे म्हणजे, मराठी साहित्याची सेवाच करणे होय. डॉ. प्रकाश खरात या लेखकाच्या वाड्.मयीन निर्मितीची व समाज जीवनविषयक चिंतनाची दिशा स्पष्ट व्हावी म्हणून मी गौरवग्रंथ संपादित केला आहे." अशी प्रांजळ कबुली संपादक प्रोफेसर डॉ. रूपेश नरहरी क-हाडे यांनी आपल्या मनोगतात दिली.या प्रसंगी डॉ.प्रकाश खरात यांनीही आपले यथोचित मनोगत मांडले.
ज्येष्ठ नाटककार दादाकांत धनविजय यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर ॲण्ड लिटरेचर, नागपूर या संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी तर राजन वाघमारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला दिग्गज साहित्यिक इ.मो.नारनवरे, डॉ.वि.स.जोग,भुपेश थुलकर,अरूणा सबाणे, डॉ.धनराज डहाट, रमेश शंभरकर, डॉ.निलकांत कुलसंगे,रमेश सोमकुवर, प्रसेनजित ताकसांडे,
डॉ.अशोक कांबळे, डॉ. विनोद जीवनतारे, डॉ. विशाखा नारनवरे, डॉ. अनमोल शेंडे, डॉ. स्मिता शेंडे, डॉ.कार्तिक पाटील डॉ.बळवंत भोयर, प्रा. रचना खरात, प्रा. गोल्डी जांभूळकर प्रवीण कऱ्हाडे, प्रा. हेमलता उराडे, ॲड.दीपक खरात, हर्षवर्धन खरात, प्रियवर्धन खरात, डॉ.तुषार तलवारे, ॲड.प्रणाली तलवारे, गुंजन कऱ्हाडे, सृजन कऱ्हाडे, आदी साहित्यिक आणि मान्यवर प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गौरव समीक्षा ग्रंथाच्या प्रकाशनाबद्दल डी.व्ही.एस. पी.मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.विजयकुमारजी बंग, उपाध्यक्ष डॉ.प्रदीप मेहता,सचिव श्याम भाऊ महिंद्रे पाटील, सचिव डॉ.अभय पाटील, कोष्याध्यक्ष रघुराजसिंग चौहाण आणि प्राचार्य डॉ.ए.आर.लाडोळे, महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ.रूपेश कऱ्हाडे यांचे मनापासून अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.