" एमआयडीसी " भूसंपादन प्रकरणी शेतकरी आक्रमक ; जमीन मोजणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठवले.

" एमआयडीसी "  भूसंपादन प्रकरणी शेतकरी आक्रमक ; जमीन मोजणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठवले.


विशाल बांबोळे - कार्यकारी संपादक


चामोर्शी  : जिल्ह्यात प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाने नोटीस काढली आहे. त्याकरिता मंगळवारी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन जमीन मोजणीसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी परतून लावल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुधोलीचक क्र. १ या गावातील ही घटना असून नागरिकांचा उद्योगासाठी जमीन देण्यास विरोध आहे.


चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, मुधोली चक क्र.१, सोमनपल्ली, जयरामपूर, मुधोलीचक क्र.२, पारडी देव या परिसरातील ९६३.०५२२ हेक्टर जमीन शासनाने लोहप्रकल्पासाठी प्रस्तावित केली आहे. त्याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने काही महिन्यांपूर्वी संबंधित जमीन मालकांना भूसंपादन संदर्भातील नोटीस पाठवली होती. 


परंतु जमीन देण्यास येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यांनी दोनवेळा या भूसंपादनाविरोधात मोर्चा काढला होता. तेव्हापासून यापरिसरात प्रशासन विरूद्ध गावकरी अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशात मंगळवारी चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी जमीन मोजणीसाठी मुधोलीचक क्र.१ या गावात गेले असता त्यांना गावकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला.


गावकऱ्यांचा विरोध बघता परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परंतु गावकऱ्यांच्या विरोधापुढे टिकाव न लागल्याने कर्मचाऱ्यांना मोजणी न करताच परतावे लागले. उद्योगांना जमीन देण्यावरून गावकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र असून बहुतांश शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध आहे. तर काहींना जमिनीचा मोबदला वाढवून हवा आहे. यापूर्वीही इतर गावात असाच प्रकार घडल्याने प्रशासनापुढे भूसंपादनाचा मोठा पेच निर्माण झाला आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादनाची नोटीस आधीच पाठविण्यात आलेली आहे. त्यानुसार आम्ही जमीन मोजणीसाठी गेलेलो असताना गावकऱ्यांनी विरोध केला. म्हणून मोजणी न करताच आम्हाला परतावे लागले. - उत्तम तोडसाम,उपविभागीय अधिकारी चामोर्शी

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !