वाशिम जिल्ह्यात ११ हजार कुपोषित बालके आढळली. ★ सर्वांच्या सहकार्याने सुदृढ पिढी घडवुया : सीईओ,वैभव वाघमारे

वाशिम जिल्ह्यात ११ हजार कुपोषित बालके आढळली.


★ सर्वांच्या सहकार्याने सुदृढ पिढी घडवुया : सीईओ,वैभव वाघमारे


एस.के.24 तास


वाशिम : कुपोषण मुक्तीसाठी शासन स्तरावरून वेळोवेळी घोषणा केल्या जातात. मात्र, तरीही कुपोषित बालकांची समस्या कायम असून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत ११ हजार ४८५ कुपोषित बालके आढळून आली आहेत. जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी आढावा बैठक घेऊन आगामी १५ ऑगस्ट पर्यंत कृती आराखडा तयार करून कडक उपाय योजना करण्याचे निर्देश दिले.


नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी बैठकाचा सपाटा लावून जिल्हा प्रशासन गतिमान व पारदर्शक करण्यावर भर दिला आहे. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी बैठकीत जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करून नियोजन केले. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी कुपोषणाबाबत जिल्ह्यातील परिस्थिती विषद केली. 


ते म्हणाले जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील २८५ बालके ही अति तीव्र (सॅम) तर १०६७ बालके ही तीव्र (मॅम) श्रेणीत असे एकूण १३५२ बालके कुपोषित आहेत. तसेच (एस ए डब्लू ) बालके २१२० आणि (एम यू डब्लू ) बालके ९३६५ असे जिल्ह्यातील एकुण ११४८५ बालके कुपोषित असल्याची माहिती त्यांनी दिली. ही आकडेवारी चिंताजनक असून यासाठी विशेष प्रयत्नांची गरज व्यक्त केली जात आहे.


कुपोषण मुक्तीसाठी त्रिसुत्री कार्यक्रम

या त्रिसूत्री नुसार मातेच्या दुधामध्ये ९० टक्के कुपोषण दूर करण्याची शक्त्ती असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व स्तनदा आणि गरोदर मातांना स्तनपान करण्याचे व्यवस्थित प्रशिक्षण आशा आणि अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या करिता आशा व अंगणवाडी सेविकांना पोषणाबाबत दोन महिन्यामध्ये तिन वेळा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर या आशा व अंगणवाडी सेविका जिल्ह्यातील सर्व स्तनदा व गरोदर मातांना प्रशिक्षण देतील.


 लहान मुलांचा शारीरिक व बौध्दिक विकास करणे ही अत्यंत महत्वाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. त्यामुळे जिथे कुपोषित बालक असतील त्या अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक सॅम, मॅम बालकांकडे २ महिने विशेष लक्ष देतील. प्रत्येक अंगणवाडी करिता एक पालक कर्मचारी नेमून बालकांकडे विशेष लक्ष देण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यावर देण्यात आली आहे. पालक कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेऊन त्यांच्याकडून काम करुन घेण्याकरीता क्लास वन अधिकारी यांची पालक अधिकारी तसेच सहाय्यक पालक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे.


एखाद्या कुपोषित मुलांकडे बारकाईने लक्ष दिल्यास जास्तीत जास्त दोन माहिन्यामध्ये त्याला कुपोषणातुन बाहेर काढणे शक्य आहे मात्र यासाठी बाळाचे योग्य पोषण होणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी व्यक्त केले.


सर्वांच्या सहकार्याने सुदृढ पिढी घडवुया : सीईओ,वैभव वाघमारे

कुपोषणामुळे बालकांचा शाररिक व बौध्दिक विकास खुंटतो. कुपोषण हा गंभीर आजार नसला तरी याकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरु शकते. त्यामुळे जिल्ह्यातुन कुपोषण हद्दपार करुन सुदृढ पिडी घडविण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी व्यक्त केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !