दुर्गम,आदिवासी अशी ओळख असलेला गडचिरोली जिल्हा आता विकासाच्या वाटेवर स्वार. - उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस
एस.के.24 तास
गडचिरोली : दुर्गम,आदिवासी अशी ओळख असलेला गडचिरोली जिल्हा आता विकासाच्या वाटेवर स्वार झालेला आहे. येत्या काळात अनेक प्रकल्प जिल्ह्यात आकाराला येणार असून यातून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.जिल्ह्यात सुरु असलेले प्रकल्प आणि प्रस्तावित कार्य पाहता आता गडचिरोली जिल्हा हा राज्यातला शेवटचा नाही तर पहिला जिल्हा म्हणून नावारूपास येत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गडचिरोली पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित गडचिरोली महोत्सवाला दिलेल्या भेटी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती डब्ल्यू. चांदवाणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्या.आशुतोष करमरकर, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, नक्षलविरोधी अभियानचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, जिल्हाधिकारी,संजय मीणा,पोलीस अधीक्षक,आदी उपस्थित होते.
शुक्रवार राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते गडचिरोली महोत्सवाचे उद्घाटन झाले.यानिमित्ताने विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री तसेच मॅरेथॉन आदी कार्यक्रमांची रेलचेल आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध स्टॉलला भेटी देऊन वस्तूंची पाहणी केली. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचाही त्यांनी आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना त्यांनी गडचिरोली पोलिसांनी केवळ कायदेशीर कारवाईपर्यंत सिमीत न राहता जास्तीत जास्त समाजाभिमुख कार्यक्रम घेऊन समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून समाजात सद्भावना तयार करण्याचे काम केल्याबद्दल अभिनंदन केले.
महोत्सवाच्या माध्यमातून गडचिरोलीच्या विविध भागात काम करणाऱ्या कलाकारांना स्टॉल्स उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलेतून अर्थार्जन करणे सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक अभिसरण घडविण्याचे काम पोलिस दलाच्या माध्यमातून होत आहे.
या सर्व कामाच्या माध्यमातून आज गडचिरोली जिल्हा विकासाकडे जात असून पूर्वीची राज्यातला शेवटचा जिल्हा ही ओळख बदलून आज गडचिरोली जिल्हा पहिला जिल्हा अशी ओळख निर्माण झाली आहे,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.