गडचिरोली जिल्ह्यातील आमच्या गावात विकसित भारत संकल्प यात्रा नको.
★ या ग्रामपंचायतीचा ठराव चर्चेत.
एस.के.24 तास
कुरखेडा : भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्याच्या उद्देशाने राज्यभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील तळेगाव च्या ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्याने प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे. यासंदर्भात तळेगाव ग्रामपंचायतीने नुकताच ठराव घेत " ही यात्रा आमच्या गावात नको अस स्पष्ट केले आहे.त्यामुळे ही यात्रा पुन्हा एकदा वादात सापडली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश भागात रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत.त्यामुळे दिवसभर ते शेतात राबत असतात. त्यात राज्य सरकारने गावागावात " विकसित भारत संकल्या " त्रेचे आयोजन केल्याने ग्रामस्थांना यात सहभागी होणे शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात येत असलेल्या तळेगाव ग्रामपंचायतीने मासिक सभेत " विकसित भारत संकल्प " यात्रा आमच्या गावात नको, असा ठराव घेतल्याने अखेर अत्यल्प उपस्थितीत प्रशासनाला ही यात्रा पार पाडावी लागली.
राज्य शासनाच्या आदेशाने ठिकठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु शेतीचा हंगाम सुरू असल्याने ग्रामीण भागात नागरिक व्यस्त आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना यात सहभागी होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात विकसित भारत संकल्प यात्रा काढून नागरिकांना उपस्थित राहण्याबाबत आग्रह करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी यात्रेला विरोध दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वी चामोर्शी तालुक्यातील देखील एका तरुणाने यात्रेतील वाहनावर " मोदी सरकार " असा उल्लेख असल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. तशी चित्रफित समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाली होती.