सहा लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवाद्यास अटक.
एस.के.24 तास
गडचिरोली : विविध हिंसक गुन्ह्यात सहभागी असलेल्या महिला नक्षलवाद्यास अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.
राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा वय,३०वर्ष रा.बडा काकलेर,छत्तीसगड असे अटक करण्यात आलेल्या महिला नक्षलवाद्याचे नाव असून तिच्यावर एकूण सहा लाखांचे बक्षीस होते.
मूळची छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात येणाऱ्या बडा काकलेर गावातील रहिवासी असलेली राजेश्वरी २००६ साली नक्षल्यांच्या चेतना नाट्य मंचात भरती झाली.त्यांनतर २०१०-११ मध्ये तिला उपकमांडर पदावर बढती देण्यात आली.पुढे २०१६ ते २०१९ पर्यंत फसेगड दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. २०१९ मध्ये बिजापूर चकमकीत दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती.२०२० साली कारागृहातून बाहेर पडताच तिला दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीत " एरिया कमिटी मेंबर " म्हणून जबाबदारी देण्यात आली.
यादरम्यान पोलिसांसोबत झालेल्या चार चकमकीत तिचा थेट सहभाग होता. यात छत्तीसगडमधील फसेगड, बिजापूर, भोपालपट्टनम आणि गडचिरोली जिल्ह्यातील केडमारा चकमकीचा समावेश आहे. याप्रकरणी तिच्यावर महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये विविध गुन्हे दाखल असून सहा लाखांचे बक्षीसदेखील होते. गडचिरोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी छत्तीसगड सीमाभागात सापळा रचून तिला अटक केली.
नक्षल्यांच्या ‘टीसीओसी’ कालावधीत पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी विशेष पथकाने ही कारवाई पार पाडली. मागील दोन वर्षात गडचिरोली पोलिसांनी एकूण ७३ नक्षल्यांना अटक केली आहे.