आदिवासी लोकांसाठी विविध योजनांची जागृती.
एस.के.24 तास
चिमुर : भिसी दिनांक 28 जानेवारी 2024 महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विभागा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आदिवासी बांधवांना व्हावी, याकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूरच्या वतीने ब्राईट एज फाउंडेशन भिवापूरच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विभागामार्फत 30 पेक्षा जास्त योजनांचा आदिवासी बांधवांना लाभ देण्यात येतो. यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांसाठी जाळीच्या ताराचे कुंपण, काटेरी तार, सौर कुंपण, भाजीपाला बियाणांची किट, विविध पिकांची बियाणे, बांबू लागवडीसाठी अनुदान, मशरूम लागवडीसाठी अनुदान, ताडपत्री योजना, मचान, निंबोळ्या गोळा करण्यायासाठी जाळी, अर्थसहाय्य, भात कापणी यंत्र,महिलांकरिता व तरुणींकरिता शिवण यंत्र.
विद्यार्थ्यांसाठी एमएससीआयटीचे प्रशिक्षण,लनामांकित शाळा योजना, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण,आदिवासी वस्तीगृह व निर्वाह भत्ता लघु उद्योगासाठी अर्थसहाय,घरकुल योजना, आटा चक्की, मिरची कांडप, पत्रावळी बनवण्याची यंत्र व इतर योजनांची प्रचार प्रसिद्धी संपूर्ण चिमूर प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तालुक्यात व गावात सुरू आहे. यामध्ये डोंगरला,शिवरा,सावरला,तिरकुरा, गरडापार,कन्हाळगाव,चक जांभूळविहिरा, कपरला,आंबेनेरी,बोरगाव बुट्टी इत्यादी गावांमध्ये ब्राईटएज फाउंडेशनच्या कलापथकामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
या पथकामध्ये कलावंत म्हणून सचिन भरडे, विलास चौधरी, सुरज राजनहिरे,सुनील ननावरे, प्रशांत दडमल,मंगेश जीवतोडे,श्रीकांत दडमल,श्रुती चौधरी,सोनू दडमल व गोलू मगरे यांचा समावेश आहे. या सर्व जनजागृती कार्यक्रमाला आदिवासी बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून आदिवासींनी या योजनांचा लाभ घेण्याची आवाहन कला पथकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.