" फुले,शाहु,आंबेडकरी " विचारधारेने प्रेरीत होऊन जांब (बुज.) येथील युवकांनी स्थापन केले.
★ " प्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय "
एस.के.24 तास
सावली : लोक राहण्यासाठी घर बांधतात,पण पुस्तकांसाठी राजगृह बांधनारे जगातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानपिपासु, प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर.' आणी प्रज्ञासूर्याच्या याच कार्याने प्रेरीत होऊन सावली तालुक्यातील जांब (बुज.) येथील युवकांनी वाचनालयाची निर्मिती केली आहे.
गावात वर्तमानपत्रांची उपलब्धता व्हावी, गावात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, आज स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना गावातच विविध स्पर्धात्मक पुस्तके उपलब्ध व्हावी, गावातील नागरिकांना बुद्ध,फुले,शाहु, आंबेडकर,शिवरायांचा संघर्षमय आणी मानव कल्याणकारी इतिहास माहिती व्हावा या विविध उद्देशांनी येथील सुशिक्षित युवकांनी स्वता पैशांची बचत करुन गावात एक पुस्तकांचे घर अर्थात वाचनालयाची निर्मिती केल्याने परिसरात कौतुक होत आहे.
२००१ साली येथील पंचशील बौद्ध समाजातील तत्कालीन सुशिक्षित आंबेडकरी तरुणांनी नेहरूजी उंदीरवाडे,चक्रपाणी निमगडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन वाचनालय निर्मितीचा पाया घातला होता.पण आर्थिक परिस्थितीच्या कारणाने वाचनालय पुढे वाटचाल करु शकले नाही.
मात्र त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मागील काही वर्षापासुन समाजातील नवयुवकांनी संघरत्न निमगडे यांच्या अध्यक्षतेखाली गजानन आलेवार, अमित पी. वाकडे, संदीप रामटेके,अक्षय कोसनकार, प्रफुल साखरे, रोहित उंदीरवाड़े यांच्या समितिने वाचनालयाला नवे वळन दिले.
त्यासाठी सर्वप्रथम या युवकांनी समाजातील बुद्ध विहाराचा आधार घेत तिथे प्रथम वाचनालय चालु करण्याचा निर्णय घेतला.आधीपासुनच शैक्षणिक कार्यात सकारात्मक असलेल्या या बौद्ध समाजाने सुद्धा युवकांना प्रोत्साहन देत बुद्ध विहाराची एक खोली वाचनालयासारख्या शैक्षणिक कामाकरीता दिली.
पुढे २०१८ मध्ये वाचनालयाची एक प्रशस्त ईमारत असावी या हेतुने समितीने क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री. विजय वड्डेटीवार यांच्याकडे प्रस्ताव मांडून आमदार निधी मधुन ईमारतीचे बांधकाम पुर्ण केले.कोरोना काळात सर्व शाळा, महाविद्यालये बंद स्थितित असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वाचनालयामध्ये याच सुशिक्षित तरुणांनी मोफत शिकवणी वर्ग चालु केले.
वाचकांना वर्तमानपत्रे,शालेय आणी स्पर्धा परीक्षेचे पुस्तके उपलब्ध करुन दिले.महामानवांच्या जयंतीदिनी विविध शैक्षणिक स्पर्धात्मक उपक्रम राबवुन गावात शिक्षणाचे महत्व पटवून देण्यास वाचनालय महत्वाची कामगीरी बजावत आहे.वाचनाल्याचे दैनंदिन खर्च आणी नुकत्याच झालेल्या अधिकृतरित्या रजिस्ट्रेशन करिता समितीच्या सभासदांनी स्वता पैशांची बचत करुन तो पैसा वाचनालयाच्या कामाकरीता उपलब्ध करुन वाचनालयाचा आर्थिक प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न करत आहे.
फुले,शाहु,आंबेडकरी विचारधारेने चालत असलेले आणी जिल्हा परिषद शाळेच्या समोर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा परिसरात अत्यंत देखने स्वरुपात उभे असलेले हे वाचनालय खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या सामाजिक आणी शैक्षणिक विचारांना पुढे नेण्यास प्रयत्नशील आहे.