काँग्रेस चा एक गट भाजप मध्ये जाणार ही भाजप कडून च पेरलेली अफवा. - महाराष्ट्र प्रभारी,रमेश चेन्नीथला

काँग्रेस चा एक गट भाजप मध्ये जाणार ही भाजप कडून च पेरलेली अफवा. - महाराष्ट्र प्रभारी,रमेश चेन्नीथला 


एस.के.24 तास


गडचिरोली : देशात जाती-धर्मात तेढ निर्माण करून भाजप निवडणुका जिंकू पाहत आहे. ‘ईडी’चा धाक दाखवून ते पक्ष फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये जाणार ही अफवा सुध्दा भाजपनेच जाणीवपूर्वक पसरवली आहे. यात तथ्य नसून सर्व नेते एकजुटीने येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी गडचिरोली येथे व्यक्त केला.


विभागीय आढावा बैठकीनिमित्त काँग्रेस नेते तथा महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, देश तोडणाऱ्या शक्तिसोबत आमचा लढा आहे. राहुल गांधींनी याविरोधात काढलेल्या भारत जोडो यात्रेचे जनआंदोलनात रूपांतर झाले आहे. देशातील सर्व सामान्य नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच दर्शवते. भाजप देशातील एकतेला संपवून धर्मांधतेला खतपाणी घालत आहे. ईडी सारख्या संस्थांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना घाबरविण्यात येत आहे. या अराजकतेला संपविण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन लढा देत आहोत. 


सामजिक एकोप्याला धक्का न लावता राजकारण केले पाहिजे,पण भाजप तर राम मंदिरा च्या नावावर निवडणुका लढविण्याची तयारी करीत आहे. महाराष्ट्रातही आमचा पक्ष एकजूट आहे.त्यामुळे च एक गट भाजपमध्ये जाणार अशी अफवा ते पसरवत आहेत.असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.इंडिया आघाडी तील जागा वाटप संदर्भात चर्चा सुरू असून लवकरच यावर एकमत होईल असेही ते म्हणाले.


प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत चर्चा सुरू : - 

इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे. लवकरच यावर सकारात्मक तोडगा निघेल.पुढे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी यावेळेस काँग्रेस पक्ष आधीच यादी जाहीर करण्याबाबत विचार करीत असल्याचेही चेन्नीथला यांनी यावेळी सांगितले. 


पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सुनील केदार, शिवाजीराव मोघे यांच्यासह काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !