नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात.
■ नागपुरात ट्रक चालकानी रस्ता रोखून टायर जाळले.
एस.के.24 तास
नागपूर : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात नागपुरातील भंडारा रोड, अमरावती रोडवर सकाळपासून ट्रकचालकांनी रस्ता रोको सुरू केले आहे. ट्रक चालकांनी काही भागांत टायर जाळल्याने तणाव निर्माण झाला होता. अमरावती मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवून वाहतूक सुरू केली, परंतु भंडारा रोडवरील वाहतूक ठप्प पडल्याने सर्वसामान्यांना प्रचंड मन:स्ताप होत आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात नागपुरातही विरोध होत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळपासून नागपूरसह राज्यातही ठिकठिकाणी ट्रकचालक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. ट्रक चालकांकडून कुठे चक्का जाम तर कुठे रस्त्यावर टायर पेटवले जात असल्याने अनेक महामार्गांवरील वाहतूक ठप्प पडली आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली आहे. सोबतच सात लाख रुपये दंडदेखील आकाराला जाणार आहे.
कायद्याच्या विरोधात नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून ट्रक चालकांनी चक्काजाम केले. या कायद्यात वाहनचालक खासकरून ट्रकचालकांविरोधात एकतर्फी कारवाईची तरतूद करण्यात आली असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. अपघाताच्या स्थळावर थांबल्यावर चूक नसताना देखील लोक ट्रकचालकाला मारहाण करतात. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी ट्रकचालक पळून जातात. मात्र, नंतर ते पोलिसांकडे जाऊन माहिती देतात. त्यामुळे हा कायदा वाहन चालकांच्या विरोधात असल्याची प्रतिक्रिया देत ट्रकचालकांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे.
याचवेळी पारडीहून पुढे नागपूर - भंडारा रोडवर आणि दुसरीकडे अमरावती मार्गावरही ट्रकचालकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे. अमरावती मार्गावर पोलिसांनी आंदोलकांना हटवून महामार्गावरील वाहतूक सुरू केली. परंतु भंडारा मार्गावर तणावाचे वातावरण कायम असून वाहतूक ठप्प आहे. आंदोलकांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि जिल्हाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावण्याची मागणी रेटून धरली आहे.