देशाच्या प्रगतीसाठी गाव विकसीत होणे गरजेचे कोंडेखल (ता.सावली) येथे संकल्प यात्रेत जिल्हाधिका-यांचा गावक-यांशी संवाद.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : केंद्र सरकारने सुरू केलेली विकसीत भारत संकल्प यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात गावागावात जावून लोकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देत आहे.
गावक-यांनीसुध्दा या योजनांचा लाभ घेऊन आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करावे. गाव विकसीत झाले तरच आपला देश प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.सावली तालुक्यातील कोंडेखल येथे विकसीत भारत संकल्प यात्रेत गावक-यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील, गटविकास अधिकारी मधुकर वासनिक, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी धनश्री अवगड, गटशिक्षणाधिकारी संध्या कोनपतिवार,विस्तार अधिकारी संजीव देवतळे,सरपंच,सरला कोटांगले,उपसरपंच,नरेश बावनवाडे,ग्रामसेवक आनंद देवगडे आदी उपस्थित होते.
गावक-यांसोबत संवाद साधतांना जिल्हाधिकारी श्री.गौडा म्हणाले,विकसीत भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत शासकीय योजना पोहचविणे, योजनांपासून वंचित असलेल्यांना लाभ मिळवून देणे,ज्यांना लाभ मिळाला आहे अशा नागरिकांचे अनुभव इतरांपर्यंत पोहचविणे, यासाठी ही संकल्प यात्रा एक महत्वाचे व्यासपीठ आहे.
गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिले स्वत:मध्ये बदल करावा, त्यानंतरच आपण आपल्या गावामध्ये बदल घडवू शकतो.तुमचे उत्पन्न, मुलांचे शिक्षण, आरोग्याच्या सुविधा यासाठीसुध्दा गावक-यांनी आग्रही राहावे. विकसीत भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा कारण गाव विकसीत तरच देश विकसीत होईल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हाधिका-यांनी विविध विभागांच्या स्टॉलला भेट दिली. तसेच या स्टॉलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना काय माहिती दिली जाते,हे जाणून घेतले.यावेळी वैयक्तिक लाभाच्या योजना,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर,आयुष्मान कार्ड, मोदी आवास योजना घरकुल मंजुरीचे पत्र आदींचे लाभार्थ्यांना वाटप केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटविकास अधिकारी श्री.वासनिक यांनी तर आभार तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी मानले.यावेळी राजू परसावार,बंडू मुरकुटे,तालुका अभियान व्यवस्थापक कल्पना देवडाळकर,शुभम श्रीकोंडावार,सहाय्यक कार्यक्रमाधिकारी भक्तदास आभारे,प्रशांत भोयर,संजय दुधबळे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.