मुल येथे पहिले महिला झाडीबोली साहित्य संमेलन संपन्न : तीन ठराव मंजूर ■ महिलांनी न घाबरता आपली लेखणी चालवावी : संमेलनाध्यक्ष,कवयित्री शशिकला गावतुरे


मुल येथे पहिले महिला झाडीबोली साहित्य संमेलन संपन्न : तीन ठराव मंजूर


■ महिलांनी न घाबरता आपली लेखणी चालवावी : संमेलनाध्यक्ष,कवयित्री शशिकला गावतुरे


एस.के.24 तास


मुल : मुल जि.चंद्रपूर (राजमाता जिजाऊ साहित्य नगरी)झाडीबोली  साहित्य मंडळ चंद्रपूर आणि झाडीबोली साहित्य मंडळ  मुल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले महिला झाडीबोली साहित्य संमेलन बालविकास प्राथमिक शाळेत नुकतेच संपन्न झाले.उद्घाटन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे हस्ते झाले.


या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री सौ. शशिकला गावतुरे होत्या.स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष  रत्नमालाताई  भोयर, झाडीबोली साहित्य मंडळाचे ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर, डॉ. विशाखा कांबळे,  डॉ. चंद्रकांत लेनगुरे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव गावतुरे,प्रभाकर भोयर, आशुतोष सादमवार, रूपेश मारकवार ,जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर, कवी लक्ष्मण खोब्रागडे, माजी न.प. उपाध्यक्ष  नंदू रणदिवे, माजी नगरसेवक प्रशांत समर्थ  आदींची उपस्थिती होती.

      


यावेळी संमेलनाध्यक्षा कवयित्री सौ . शशिकला गावतुरे म्हणाल्या, कवयित्री म्हणून माझी ओळख झाडीबोली साहित्य मंडळाच्या माध्यमातून सर्वदूर झाली. मी आजवर  राष्ट्रपिता महात्मा फुले ,  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी  सांगितलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधूता या विचारांवर आधारित लेखन केले आहे .त्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या कविता लिहून काढल्यात समाजात मला विधवा स्त्रियांची होणारी अवहेलना,हाल पाहवत नाही.सधवा विधवा हा भेद नष्ट झाला पाहिजे .


  मुलींना वस्तू समजू नका व लग्नात कन्यादान करणे हा विधी बंद व्हायला पाहिजे. स्त्री पुरुष समानता असली पाहिजेत. सर्वांना समान न्याय, अधिकार, मान - सन्मान , शिक्षण मिळाले पाहिजे. 

  "  महात्म्याला आठवा, त्यांचे विचार साठवा !

   समाज भयमुक्त होणे गरजेचे आहे म्हणून आता 

       महिलांनी न घाबरता लेखनी चालवली तर  आपल्या झाडीपट्टी संस्कृतीची ओळख नव्या पिढीला होईल. येथील धान रोवण्याचे गाणी, पाळण्याचे गाणी, जात्यावरची गाणी संकलन करून प्रकाशित केले गेले पाहिजेत. आपल्या बोली विषयी , आपल्या प्रदेशाविषयी 


वर्तमानपत्रातून स्तंभलेखन केले गेले पाहिजेत.  येथील झाडी नाट्य चळवळीत कलावंत म्हणून महिला कलावंतांनी सहभागी झाले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.  उद्घाटक हंसराज अहिर म्हणाले की, बोलींनी आपली महान संस्कृती जपून ठेवली. या मानवतावादी संस्कृतीचा परिचय जगाला व्हावा यासाठी साहित्यिकांनी लेखन केले पाहिजेत असे ते म्हणाले.


 प्रमुख अतिथी बंडोपंत बोढेकर म्हणाले, मुल या ऐतिहासिक नगरीत होणारे पहिले महिला झाडीबोली साहित्य संमेलन निश्चितच दिशादर्शक ठरेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यात मोठ्या प्रमाणात झाडीबोली शब्द दिसून येतात. त्यांनी तर खंजिरी भजनांच्या माध्यमातून झाडीबोलीचा सुगंध सर्वदूर पसरविला. राष्ट्रसंताच्या मातोश्री संत मंजुळामाता यांच्या त्यागी जीवनावर श्री. बोढेकर यांनी माहिती दिली.

        

स्वागताध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी प्रास्ताविक केले. अरूण झगडकर लिखित स्वागत गीत विद्या कोसे यांनी प्रस्तुत केले तर झाडीगौरव गीत शाहिर नंदकिशोर मसराम (कुरंडी - चक) यांनी सादर केले.

 

झाडीबोली महिलारत्न पुरस्काराचे वितरण : - 


झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने प्रथमतःच सुरू करण्यात आलेल्या झाडीबोली महिला रत्न पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री प्रा. रत्नमाला भोयर,शितल कर्णेवार , गायत्री शेंडे, मंगला गोंगले, वृंदा पगडपल्लीवार,भारती तितरे, प्रिती जगझाप, मंजुषा दरवरे, प्रभा चौथाले यांना  देऊन गौरविण्यात आले. 


पुस्तक प्रकाशन : -

 हिरदयातली खपली  प्रातिनिधिक काव्यसंग्रह (संपादक - प्रा. रत्नमाला भोयर), मनभावना (सुनिता बुटे),  क्रांतीपर्व (शशिकला गावतुरे), वृंदावन (वृंदा पगडपल्लीवार) या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.


 आकर्षक ग्रंथ दिंडी आणि रांगोळी स्पर्धा : - 


 संमेलनाच्या निमित्ताने नवभारत विद्यालय मुल ते गांधी पुतळा ते संमेलन स्थळ  या मार्गाने ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ग्रंथ दिंडीत राष्ट्रसंताची ग्रामगीता, भारतीय संविधान, श्रीतुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी आदी झाडीबोली ग्रंथ ठेवण्यात आले होते.  संमेलन स्थळी रांगोळी व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती. दिंडीचे सुक्ष्म नियोजन सुखदेव चौथाले, नामदेव पिज्दूरकर, नागेंद्र नेवारे,गणेश मांडवकर, विजय लाडेकर, वर्षा भांडारवार, स्मिता बांडगे, परमानंद जेंगठे, गुरूदेव बोदलकर आदी शिक्षक वृंदांनी केली होती.

   

बहिणाबाई चौधरी विचारमंचावर दुपारच्या सत्रात लोकगीत आणि महिला साहित्य या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या किरण गजपुरे,डॉ. विशाखा कांबळे, डॉ. कल्पना नरांजे, संगीता बढे , मुख्याध्यापिका सुनिता बुटे,अल्का राजमलवार आदींनी विचार व्यक्त केले. 


 तिसऱ्या सत्रात संत मंजुळा माता विचारमंचावर निमंत्रितांचे  कवीसंमेलन घेण्यात आले. अध्यक्षस्थानी झाडीपट्टीची बहिणाबाई अंजनाबाई खुणे होत्या.त्यात डॉ.अर्चना जुनघरे,सौ. मंजुषा खानेकर, रोहिणी मंगरूळकर, सविता झडे,भारती लखमापूरे, संगीता मालेकर,वंदना हटवार , मनिषा मडावी, अपर्णा नैताम,भारती तितरे,प्रिती चहांदे, अर्जुमन शेख आदी ४७ कवयित्रींनी आपल्या स्वरचित कविता ऐकविल्या. कवीसंमेलनाचे प्रभावी सूत्रसंचालन आरती रोडे यांनी केले.

 

समारोपीय कार्यक्रम संमेलनाध्यक्ष कवयित्री शशिकला गावतुरे, ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे, प्रभाकर भोयर,माजी नगरसेवक चंद्रकांत आष्टनकर,  कैलास चलाख,कवी लक्ष्मण खोब्रागडे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. मंडळाचे अध्यक्ष कवी अरूण झगडकर यांनी  दिवसभरात चाललेल्या साहित्य चर्चेवर मत मांडत संमेलनाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या महिलांचे कौतुक केले. 


यावेळी स्वागताध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी तीन ठराव मांडले. चंद्रपूर गोंदिया रेल्वेला झाडीपट्टी एक्सप्रेस नांव देण्यात यावे, गोंडवाना विद्यापीठात झाडीबोली साहित्य अध्यासन सुरू करण्यात यावे, पदवी अभ्यासक्रमात झाडीबोली साहित्याचा समावेश करण्यात यावा,हे तिन्हीही ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सूत्रसंचालन एड. सारिका जेनेकर यांनी केले. वंदेमातरम गायनाने सांगता करण्यात आली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !