आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावात रविवारी मध्यरात्री हत्तींनी धुडगूस.
■ पाच घरांची नासधूस मध्यरात्री नागरिकांची पळापळ.
एस.के.24 तास
आरमोरी : काही काळासाठी गोंदिया जिल्ह्यात गेलेला रानटी हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला असून आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावात रविवारी मध्यरात्री हत्तींनी धुडगूस घातला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाच कुटुंबांना जीव वाचवण्यासाठी घर सोडून पळ काढावा लागला. हल्ल्यात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.२४ डिसेंबरच्या मध्यरात्री २० ते २२ रानटी हत्ती आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावातील पाच घरांवर हल्ला केला. सुरुवातीला अशोक वासुदेव राऊत यांच्या घराला धडक दिली.
हत्तीची किंचाळी ऐकून घरातील सर्व सदस्य उठून घराच्या मागच्या दरवाज्याने पळ काढला आणि मोठ्याने आरडाओरड करून शेजाऱ्यांना जागे केले. त्यामुळे या परिसरातील घरातील सर्व सदस्य जीव मुठीत घेऊन घराबाहेर सुसाट धावत सुटले. अशोक राऊत, सूरज दिघोरे, मंगला प्रधान ,चंद्रशेखर बघमारे, दुर्गादास बघमारे यांच्या घरांचीही हत्तींनी नासधूस केली. यानंतर संपूर्ण गाव जागे झाले.पण जीवाच्या भीतीने कोणीही घराबाहेर पडले नाही.
गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले.त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम,वनपाल मुखरु किनेकर,वनरक्षक बाळू शिऊरकर,रुपा अत्करे,पंढरी तेलंग आदी दाखल झाले. हुल्ला पार्टीच्या मदतीने हत्तीच्या कळपाला हुसकावून लावले.हल्ल्यात घरांचे नुकसान झाले.पण जीवितहानी टळली.
पाच कुटुंबांना निवाऱ्याची व्यवस्था करावी : -
हत्तीच्या हल्ल्यामुळे पाच कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे समोर जायचे कोठे, रहायचे कसे, खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. यापूर्वी शंकरनगर येथे ९ सप्टेंबर रोजी हत्ती पहिल्यांदा दाखल झाले आणि शेतकऱ्यांच्या शेतातील धान्यासह बोअरवेल,इलेक्ट्रिक साहित्यांचे नुकसान केले होते. आता पुन्हा एकदा या भागात हत्तींनी प्रवेश केल्याने शेतकरी दहशतीत आहे.